भाजपचे अल्पमतातील सरकार काँग्रेसचे आणखी काही आमदार निलंबित करून बहुमत सिद्ध करू पाहत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीच्या प्रकरणासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी एक समिती स्थापन केली आहे. यात काँग्रेसचा एकमेव सदस्य आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांना निलंबित करणे योग्य होते काय, या प्रकरणात आणखी कुणाला निलंबित करता येईल, याचा निर्णय ही समिती घेणार आहे. अशाप्रकारे काँग्रेस आमदारांना निलंबित करण्याचा भाजपाचा कुटील डाव आहे. निलंबित आमदारांना मतदान करता येणार नाही आणि भाजपला बहुमत सिद्ध करणे सोपे जाईल. हे षडयंत्र भाजपचे आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
भाजपने विश्वासमत सिद्ध करताना कायदा पाळला नाही. राज्यपालांनी त्यांना १५ दिवसात बहुमत सिद्ध करावयास सांगितले होते. भाजपने ती प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण केली नाही तोपर्यंत ही सरकार असंवैधानिक आहे.
सभागृहात मतदान झाल्यावरच कोण सरकारमध्ये आहे आणि कोण नाही ते कळेल. सभागृहाबाहेर पाठिंबा जाहीर करून चालत नाही. एस.आर. बोम्मईच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असून, या आदेशाचे कायद्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे या सरकारने विशेष अधिवेशन बोलावून ८ डिसेंबरला मतदान घेऊन आपले बहुतम सिद्ध करावे. हे बहुतम मतविभाजनद्वारे करण्यात यावे. भाजपकडे १४५ सदस्य नाहीत. त्यामुळेच राज्यपालांनी त्यांना १५ दिवसात बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते.
मोदी सरकारच्या बाबतीत हा मुद्याच नव्हता. राज्यातील भाजप सरकार अल्पमतात आहे. या सरकारने विश्वासमत जिंकलेले नाही. केवळ घोडेबाजार सुरू आहे. कुणाला कोणते मंत्रिपद हवे, यासाठी घासाघीस चाललेली आहे, असेही ते म्हणाले.