जिल्हाध्यक्षांना काळे फासले; शिकवणी बंद आंदोलन

खासगी शिकवणीचालक आणि विद्यार्थी संघटना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद विकोपाला चालला आहे.

खासगी शिकवणीचालक आणि विद्यार्थी संघटना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद विकोपाला चालला आहे. शिकवणी चालक संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना काळे फासण्याच्या प्रकारानंतर शिकवणीचालक संतप्त झाले असून, काळे फासणाऱ्या दोघांना अटक करेपर्यंत शिकवणी बंद आंदोलन उभारले आहे.
जिल्ह्यात खासगी शिकवण्यांमधील सोयी-सुविधा, वाढीव शुल्काविरोधात विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली. यावर शिकवणीचालकांनी खंडणीसाठी संघटना असे करीत असल्याचा आरोप केला. या आरोपावरून संघटना आक्रमक झाल्या आहेत. बुधवारी सायंकाळी खासगी शिकवणीचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. हनुमंत भोसले एका बठकीनिमित्त येथील विश्रामगृहावर आले होते. या वेळी शिवसंग्राम विद्यार्थी संघटना व शहीद भगतसिंग विद्यार्थी संघटनेच्या दोघांनी प्रा. भोसले यांना काळे फासले.
या प्रकारामुळे संतप्त होत खासगी शिकवणीचालकांनी शिकवणी बंद करून पोलीस ठाण्यात धाव घेतली. संबंधित दोघांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. परंतु गुन्हा दाखल झाला नाही. गुरुवारी जिल्ह्यातील सर्व खासगी शिकवणीचालकांनी शिकवणी बंद आंदोलन पुकारले. विद्यार्थी शिकवणीच्या ठिकाणी गेले असता तीन दिवस शिकवणी बंद असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रा. हनुमंत भोसले यांच्यासह सर्व खासगी शिकवणीचालकांनी पुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धडक मारून गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. शिकवणी बंद आंदोलनात जिल्ह्यातील तीनशेपेक्षा अधिक खासगी शिकवणीचालक सहभागी झाले आहेत.
संघटनेला नव्हे, वृत्तीला आक्षेप!
खासगी शिकवणी व्यवसायातून लोकांना पसा दिसतो, पण श्रम दिसत नाहीत. पहाटे पाचपासून रात्री दहापर्यंत विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे कार्य केले जाते. आम्ही गुणवत्तेला पर्याय बनत आहोत. यात आमचे परिश्रम असल्याचे सांगून यातून पालक व विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न नसून, वृत्तीचा निषेध करण्यात येत आहे. संघटनेला विरोध नाही तर त्या दोघांच्या वृत्तीला आक्षेप असल्याचे प्रा. हनुमंत भोसले यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Private tuition student dispute