Priyanka Chaturvedi criticized shinde group and modi government on election commission hearing | Loksatta

“शिंदे गटाच्या आमदारांमध्ये हिंमत असेल तर…”; प्रियंका चतुर्वेदींचं टीकास्त्र, मोदी सरकारलाही केलं लक्ष्य!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ‘शिवसेना’ पक्षानाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे.

Priyanka Chaturvedi criticized shinde group
शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ‘शिवसेना’ पक्षानाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू आहे. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे कागदपत्रे व लेखी युक्तिवाद सादर करण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शिंदे गटासह मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीला त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “झेपत नसेल तर..”, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना केले लक्ष्य

काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी?

“शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल. पक्षाचे कार्यकर्ते असेल किंवा पदाधिकारी, निवडणूक आयोगाकडे सर्वाधिक प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केले आहेत. तरीही शिंदे गट एका रात्रीत म्हणत असेल आम्ही शिवसेना आहे, तर ते पैसा आणि सत्तेच्या जोरावर बोलत आहेत. मात्र, जनता, पक्षाचे कायर्यकर्ते आणि पदाधिकारी आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही ते निवडणूक आयोगासमोर सिद्धही केलं आहे. त्यामुळे संविधानानुसार निर्णय झाला तर हा निर्णय आमच्याच बाजुने लागेल”, अशी प्रतिक्रिया प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली आहे.

हेही वाचा – “असंतोष टाळण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर”, एकनाथ खडसेंची टीका

शिंदे गटाने स्वत:च्या हिंमतीवर लढून दाखवावं

“शिंदे गटाचे आमदार आणि खासदार शिवसेनेच्या चिन्हावर जिंकून आले आहेत. त्यानंतर हे लोकं जर एखादा गट निर्माण करत असेल, तर हा गट अमान्य आहे. मुळात त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आपल्या आमदाराकीचा राजीनामा देऊन स्वत:च्या हिंमतीवर लढून दाखवावं. हा एकप्रकारे राज्यातील मतदारांशी केलेला विश्वासघात आहे. आगामी निवडणुकीत जनताच यांना धडा शिकवेल”, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – अजित पवारांवर तेलंगणच्या भाजपा आमदाराची खालच्या पातळीवर टीका; अमोल मिटकरी म्हणाले, “अशा प्रवृतीला भर चौकात…”

मोदी सरकारलाही केलं लक्ष्य

दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी मोदी सरकारवरही टीकास्त्र सोडलं. “शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा निकाल आतापर्यंत यायला हवा होता. मात्र, हा निर्णय जाणीवपूर्वक पुढे ढकलण्यात येत आहे. कारण निवडणूक आयोगावर मोदी सरकारचा दबाव आहे. खरं तर निवडणूक आयोगच नाही, तर ईडी असेल किंवा सीबीआय असेल, आदी संस्थांवर मोदी सरकारचा दबाव आहे”, अशा आरोपही त्यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 13:26 IST
Next Story
सातारा : सातारा लोणंद रस्त्यावर कांदा वाहतूक करणारा ट्रक पलटी