सांगलीतील प्रदूषणाचा प्रश्न कायम; कृष्णा नदीत दोन दशकांपासून कारखान्यांचे रसायनयुक्त पाणीउत्सर्जन 

कृष्णेला आलेल्या पुराच्या पाण्यात कारखान्यातील दूषित पाणी सोडल्याने गेल्या महिन्यात लाखो जलचर प्राणाला मुकले.

सांगलीतील प्रदूषणाचा प्रश्न कायम; कृष्णा नदीत दोन दशकांपासून कारखान्यांचे रसायनयुक्त पाणीउत्सर्जन 
औदुंबरच्या डोहातील मगर.

दिगंबर शिंदे

सांगली : कृष्णेला आलेल्या पुराच्या पाण्यात कारखान्यातील दूषित पाणी सोडल्याने गेल्या महिन्यात लाखो जलचर प्राणाला मुकले. याचबरोबर नदीपात्रातील मगरींचा अधिवासाही संकटात आला आहे. पुराच्या पाण्यात उद्योगातील दुषित पाणी सोडण्याचा हा पहिलाच प्रयत्न नव्हता, तर यापूर्वीही असा प्रकार घडला असून याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाने कृष्णा कारखान्याला दोषी धरले आहे. नदी प्रदूषणाबद्दल केवळ कृष्णा कारखानाच दोषी नसून सांगली महापालिकाही दोषी आहे. गेल्या दोन दशकांपासून सांगलीचा हा प्रदूषणाचा प्रश्न सुटू शकला नाही हे सांगलीकरांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

गेल्या महिन्यात कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाने पाणीपातळीत वाढ झाली होती. नदीच्या पात्रातील पाणी वाढत असताना अचानकपणे नदीतील मासे, खेकडे हे जलचर मृत्युमुखी पडून तरंगू लागले. अगदी आमणापूरपासून भिलवडी ते डिग्रज बंधाऱ्यापर्यंत मृत माशांचा खच पडला होता. पाण्यात रसायनयुक्त पाणी मिसळल्याचा परिणाम म्हणून पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्याने लाखोच नव्हे तर कोटय़ावधी जलचरांना प्राणाला मुकावे लागले. याची प्रदूषण नियंत्रण मंडळाने गांभीर्याने दखल घेत तपासणी केली असता रेठरेच्या कारखान्यातून मळी नाल्यातून प्रक्रिया न करता सोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखाना बंद का करू नये अशी नोटीसही बजावली आहे. तरीही राजकीय पातळीवरून याला पांघरूण घातले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

औद्योगिक विकास झाला पाहिजे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, आपण जगावे यासाठी इतरांनी जीव द्यावा हे कुठल्या न्याय तत्त्वात बसते? लाखो माशांचा मृत्यूमुळे नदीतील अन्नसाखळीवर परिणाम होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. औदुंबरच्या डोहापासून अगदी मिरज तालुक्यातील म्हैसाळ बंधाऱ्यापर्यंत मगरींचे वास्तव्य वेळोवेळी दिसून आले आहे. या 50 किलोमीटरच्या टापूमध्ये अर्धशतकाहून अधिक मगरींचा वावर आहे. गेल्या आठवडय़ामध्ये पलूस तालुक्यातील आमणापूरपासून भिलवडीपर्यंत चार फुटापासून १२ फुटापर्यंत दहा मगरीचा अधिवास समोर आला आहे.

सांगली शहरालगत, हरिपूरमध्ये मगरींचे अस्तित्व वेळोवेळी दिसून आले आहे. मात्र या मगरी केवळ जानेवारी ते जून या प्रजनन काळातच आक्रमक असतात. मगरींना सरहद्द फार प्रिय असते. आपल्या सीमेत अन्य मगरींचा अधिवास हा प्राणी सहन करीत नाही. यामुळे मगरींचा ठरावीक भाग निश्चित असतो. मगरींना सुर्यप्रकाश महत्त्वाचा असल्याने त्यांना २४ तासात एकदा का होईना जमिनीवर येऊन सूर्यप्रकाश घ्यावाच लागतो. यामुळे नदीकाठी कातळावर मगर दिसल्याचे बऱ्याच जणांचा अनुभव आहे.

या मगरींचे अस्तित्वही माशांच्या मृत्यूमुळे धोक्यात येऊ शकते. या माशावर आपली भूक भागविणारेही काही बांधव नदीकाठी आहेत. त्यांच्या जगण्याचा धंदाच मासेमारी आहे. ऐन पावसाच्या हंगामातच पाणी दूषित झाल्याने नव्या पिढीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तसेच नवीन प्रकारचा खिलापी माशांची पैदासही याठिकाणी अलीकडच्या काळात वाढत चालली आहे. खिलापी जात प्रदूषित व गढूळ पाण्यातच सहज जमवून घेत असल्याने त्यांना या प्रदूषणचा फारसा त्रास होत नाही यामुळे या भागातील अन्य माशांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सध्या कृष्णेच्या पात्रामध्ये वाम, कानस, कटला, कोळशी, पिवळा, शिंगटा, मरळ, वडशिवडा, घोंगरा, मिरगल, वायडी, खरबा, कोळंबी आदी माशांचा जाती आढळून येत असल्या तरी खिलापीमुळे या माशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. खिलापी माशाकडून अन्न म्हणून या प्रजातीच्या माशांचे सेवन केले जात असून गेल्या आठ-दहा वर्षांत खिलापीची वाढती पैदास अन्य प्रजातीच्या जीवावर उठली आहे.

याशिवाय कृष्णा मैली करण्यात सांगली महापालिकाही जबाबदार आहे. शेरीनाल्यातून प्रक्रिया न करता सोडले जाणारे सांडपाणी नदी प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वारंवार इशाऱ्याच्या नोटिसा दिल्या जातात, दंडात्मक कारवाई केली जाते. पण दंड भरण्याची मानसिकता महापालिका सोडण्यास राजी नाही. याचबरोबर इस्लामपूरनजीक असलेल्या खासगी दूध डेअरीतूनही सांडपाणी प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडण्यात येते. याचाही परिणाम नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरतो आहे. केवळ प्रदूषणामुळे सांगलीचे पाणी दूषित होत असल्याने लोकांनी नदीचे पाणी पिण्यास, वापरण्यास बंद केले असून खासगी जारमधील पाणी वापरणाऱ्यांची संख्या अमर्याद आहे. हाच पैसा नदी प्रदूषण मुक्तीसाठी वापरला गेला तर निश्चितच जलचरांचे अस्तित्व कायम ठेवत सहजीवनाला चांगली सुरुवात होऊ शकते. मात्र यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे.

कृष्णा नदीतील पाणी प्रदूषणाला जबाबदार धरून महापालिकेसह दोन उद्योगांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसा बजावल्या आहेत. प्रदूषित पाणी तपासणीसाठी चिपळूणच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच दंडात्मक कारवाई अथवा फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.

– नवनाथ औताडे, उपप्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ.

मगर सहजासहजी मानवावर हल्ला करत नाही. स्वअस्तित्वाला धोका, प्रजननाचा काळ, हद्दीमध्ये घुसखोरी यावेळीच मगर आक्रमक होते. सावधानता हाच यावर उपाय आहे. मगर नदी स्वच्छतेचे मोलाचे काम करीत असल्याने तिचे सहअस्तित्व आपण स्वीकारले पाहिजे

– संदीप नाझरे, आमणापूर.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
चार जणांचे बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी