देशातून निर्यात होणाऱ्या प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थांची निर्यात वाढली आहे. आकड्यात पाहिले तर २०२२-२३ मध्ये १३०७८.४ डॉलर, २०२३- २४ मध्ये १०८८१.८ डॉलर आणि २०२४-२५ मध्ये १००९७.९७ डॉलरची निर्यात झाली आहे. देशातून प्रामुख्याने अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, बांगलादेश, लिबिया, सुदान, नेपाळ, श्रीलंका, सोमालिया, थायलंड, तांजानिया आदी देशांना निर्यात झाली आहे.
केंद्र सरकारच्या कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थ निर्यात विकास प्राधिकरणाच्या (अपेडा) मदतीने देशात तयार झालेल्या प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थांची निर्यात केली जाते. अपेडाच्या वतीने प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थ निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून २०२१-२२ ते २०२५-२६ या काळात निर्यात सुविधा, निर्यात सुविधांचा विकास, गुणवत्ता सुधारणेला चालना दिली जाते. तसेच अपेडाने सूचीबद्ध केलेल्या खाद्यपदार्थांची निर्यात केली जाते. अपेडाने देशात १०० स्टार्टअपची निवड केली असून, या स्टार्टअपकडून प्रक्रिया झालेल्या खाद्य पदार्थांची निर्यात केली जात आहे.
आर्थिक सर्व्हेक्षण २०२५-२६ नुसार देशात आगामी चार वर्षांत कृषी, समुद्री उत्पादने, खाद्य, पेय पदार्थांच्या संयुक्त निर्यातीचे मूल्य १०० अब्ज डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. अपेडा निर्यात वृद्धी करून जागतिक व्यापारात आपला हिस्सा वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे.
खाद्य प्रक्रिया उद्योगाचा पाया मजबूत करण्याचे काम पीएम-एफएमई म्हणजेच पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या माध्यमातून केले जाते.
या योजनेतून ३१ डिसेंबर १ लाख ७२ हजार ७०८ सुक्ष्म अन्न प्रक्रिया केंद्रे सुरू झाली आहेत. इतक्या उद्योगांना थेट केंद्र सरकारच्या माध्यमातून अनुदान दिले आहे, ही योजना संबंधित राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२५ च्या आकडेवारीनुसार देशात पीएमएफएमईच्या अतंर्गत बिहार २८,६४८ पहिल्या आणि महाराष्ट्रा २७,३६० प्रक्रिया केंद्रांसह दुसऱ्या क्रमाकांवर आहे.
प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून पिकांच्या काढणी पश्चात नुकसानीत घट होण्यास मदत झाली आहे. नुकसान कमी होऊन सुमारे ४५.७६ लाख टन अन्नधान्य, फळांवर दरवर्षी प्रक्रिय केली जात आहे.
या शिवाय पंतप्रधान किसान संपदा योजनेच्या अंतर्गत मेगा फूड पार्क योजना सुरू करण्यात आली आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी किमान ५० एकर जमिनीची गरज आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर अन्न प्रक्रिया,विक्री, मूल्य साखळी विकसित करण्याचे काम सुरू आहे.
आव्हाने कायम
देशातून प्रामुख्याने अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, बांगलादेश, लिबिया, सुदान, नेपाळ, श्रीलंका, सोमालिया, थायलंड, तांजानिया आदी देशांना निर्यात झाली आहे. अमेरिका वगळता अन्य निर्यात होणाऱ्या अन्य देशांची नावे जाहीर करण्यात काहीच अर्थ नाही. प्रक्रियायुक्त शेतीमाल अमेरिका, युरोप आणि आखाती देशांना निर्यात झाला तरच चांगले पैसे उद्योग आणि पर्यायाने शेतकऱ्यांना मिळणार आहेत. त्यासाठी दर्जा वाढविणे, अन्य बाजारपेठ शोधणे आणि अमेरिका, युरोपच्या बाजारपेठेच्या निकषांना पात्र ठरणे गरजेचे आहे.
dattatray.jadhav@expressindia.com
