scorecardresearch

देशातील सर्वात उंच एकतारीची मिरजेत निर्मिती

पुण्यातील कलाकाराच्या मागणीनुसार तंतुवाद्यासाठी जगविख्यात असलेल्या मिरजेतील कारागिरांनी तब्बल १२ फूट उंचीची एकतारी तयार केली आहे.

दिगंबर शिंदे

सांगली : पुण्यातील कलाकाराच्या मागणीनुसार तंतुवाद्यासाठी जगविख्यात असलेल्या मिरजेतील कारागिरांनी तब्बल १२ फूट उंचीची एकतारी तयार केली आहे. यासाठी ६० इंच घेराचा खास भोपळा वापरण्यात आला असून ही एकतारी देशातील सर्वात उंचीची ठरली आहे. मिरज शहर हे तंतुवाद्याचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पारंपरिक वाद्य निर्मितीबरोबरच येथील कारागिरांनी तंतुवाद्यनिर्मितीमध्ये अनेक प्रयोग वेळोवेळी केले आहेत. कलाकारांना आवश्यक असणारे बदल वाद्यांमध्ये करत प्रयोगशीलता जोपासली आहे. फोल्डिंग तानपुरा, काचेच्या बिलोरी हंडय़ाचा तानपुरा, शहामृगाच्या अंडय़ाचा तानपुरा यांसह पारंपरिक आणि परदेशी वाद्यांचे फ्युजन असलेली तंतुवाद्ये येथील कारागिरांनी आजवर तयार केली आहेत. प्रयोगशीलता हे या कारागिरांचे वैशिष्टय़ आहे  सरस्वती तंतुवाद्य केंद्राचे संचालक अलताबहुसेन आणि त्यांचे बंधू साजीद यांनीही वेळोवेळी दुर्मिळ तंतुवाद्ये तयार केली आहे. नुकतेच त्यांनी तब्बल १२ फुट उंचीची एकतारी तयार केली आहे. मिरजेत आजवर तयार झालेल्या तंतुवाद्यांपैकी हे सर्वात मोठे तंतुवाद्य आहे. हे वाद्य पुणे येथील एका कलाकाराने केलेल्या मागणीनुसार बनविण्यात आले आहे. यासाठी सुमारे ६० इंचाचा घेर असलेला मोठा भोपळा वापरण्यात आला आहे. हे वाद्य तयार करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला. साजीद सतारमेकर यांनी हे वाद्य अत्यंत काळजीपूर्वक बनविले आहे. याकामी त्यांना ज्येष्ठ बंधू अलताबहुसेन सतारमेकर यांचे सहाय्य लाभले आहे.

पारंपरिक आकारापेक्षा मोठी एकतारी बनविताना त्याच्या मुळच्या वादनात फरक पडणार नाही, याचीही दक्षता घेण्यात आली. या सर्वात उंच एकतारीच्या निर्मितीबद्दल अनेक कलाकारांनी सतारमेकर बंधूचे कौतुक केले आहे  सरस्वती तंतुवाद्य केंद्रात तयार झालेली ही १२ फुट उंचीची एकतारी ही देशात आजवर तयार तंतुवाद्यांपैकी सर्वात मोठे वाद्य आहे. या एकतारीचे टय़ुनिंग दर्जेदार व्हावे, यासाठी विशेष दक्षताही घेण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Production country tallest monolithic mirage artist demand world famous artisans ysh