देशभरातील जंगलात सक्रीय असलेल्या जहाल नक्षलवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय विभागाचा अध्यक्ष, तसेच या चळवळीचा राष्ट्रीय समन्वयक असलेला दिल्ली विद्यापीठातील प्रा. जी. एल. साईबाबा याला शुक्रवारी गडचिरोली पोलिसांनी दिल्लीत अटक केली. त्याच्यावर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून शनिवारी त्याला अहेरी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या अटकेमुळे देशभरातील नक्षल समर्थक खवळले असून सोशल साइट्सवर या अटकेचा निषेध सुरू झाला आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये गडचिरोली पोलिसांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या हेम मिश्रा या विद्यार्थ्यांला नक्षलवाद्यांना भेटण्यासाठी जात असतांना बल्लारपूर रेल्वे स्थानकावर अटक केली होती. त्याच्या जबाबातून समोर आलेल्या माहितीच्या आधारे सप्टेंबरमध्ये पोलिसांनी गोंदिया जिल्ह्य़ातून उत्तराखंडच्या प्रशांत सांगलीकर उर्फ राही या नक्षलवाद्याला अटक केली होती. या दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये दिल्लीत साईबाबाच्या घराची झडती घेतली होती तेव्हा वादळ उठले होते. नंतर चौकशीत साईबाबा हा नक्षलवादी चळवळीत सक्रीय असल्याचे निष्पन्न झाले होते.  आंतरराष्ट्रीय विभागाचा अध्यक्ष म्हणून त्याने अनेकदा परदेशवाऱ्या केल्या. देशातील  बुद्धीवंतांचा नक्षलवाद्यांना असलेला पाठिंबा वाढविण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. शिवाय, नक्षलवाद्यांसाठी उघडपणे काम करणाऱ्या समर्थक संघटनांना कार्यक्रम देणे, नक्षलवाद्यांच्या गुप्त संदेशांची देवाण-घेवाण करणे, अशीही कामे तो करीत असे.