विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे महाविकास आघाडीकडून सुपुर्द करण्यात आला. काँग्रेस नेते आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज (रविवार)राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचे पत्र देऊन, यासाठी विनंती केली.

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर या संदर्भात माहिती देताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, “विधानसभेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या शिफरसीने राज्यपालांना दिलेला आहे. त्यांनी तो मान्य करावा ही विनंती करण्यासाठी छगन भुजबळ, एकनाथ शिंदे आणि मी गेलो होतो. हा कार्यक्रम जाहीर करण्यास मान्यता द्यावी, अशी त्यांना विनंती केली आहे. त्यांनी बदलाबद्दल फार काही विचारणा केली नाही. आम्ही जे बदल केलेत ते लोकसभेती जी पद्धत आहे, तीच पद्धत आपण इथे विधानसभेसाठी केलेली आहे. आपली विधान परिषद देखील जवळपास तशाच पद्धतीने आहे. त्यामुळे आपण काही चुकीचं, वेगळं केलंय असं नाही. त्यांना केवळ काही अभ्यास करायचा आहे, काही माहिती घ्यायची आहे ती घेतो आणि मी कळवतो असं ते म्हणाले आहेत. राज्यपाल मान्यता देतील याची आम्हाला खात्री आहे.”

तसेच, यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगिते की, “राज्यपालांनी सरकारला जे पत्र दिलं होतं, की विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घ्या म्हणून. त्या अनुषंगानेच आम्ही मुख्यमंत्र्यांकडून पाठवलेलं पत्र आज आम्ही त्यांना दिलेलं आहे. ही जी निवडणूक आहे, उद्याच्या दोन दिवसात ही निवडणूक व्हावी. कारण, आता कायम अध्यक्ष विधानसभेला असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने नियमानुसार आम्ही ही मागणी केलेली आहे. राज्यपालांची देखील भूमिका सकारात्मक आहे. त्यांनी एवढच म्हटलं आहे की याबाबतीत मी कायदेशीर चर्चा करून, यावर उद्या निर्णय कळवतो. त्यामुळे आमची अपेक्षा आहे, शेवटी राज्यपाल हे देखील राज्याचे प्रमुख असतात. जेव्हा अशा काही घडामोडी होत असतात, त्यावेळी त्यांची भूमिका महत्वाची असते आणि म्हणून त्यांना आम्ही विनंती केलेली आहे. की लोकशाही मार्गाने विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणं गरजेचं आहे. आम्हाला अपेक्षा आहे, की ते सकारात्मक भूमिका घेतील.”

“विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त पद्धतीने न घेणार्‍या राज्य सरकारला नेमकी कसली भीती? ”

राज्य सरकारकडून विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उद्या २७ डिसेंबर रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करायचा आहे. तर, २८ डिसेंबर रोजी नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे.

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीऐवजी आवाजी मतदानाने घेण्याबाबतचा नियम समितीचा अहवाल विधानसभेत बुधवारी सादर करण्यात आला.  नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त आहे. याच अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची भूमिका सरकारने जाहीर केली आहे. गुप्त मतदानाने अध्यक्ष निवडीची पद्धत आता बदलण्यात येणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखालील नियम समितीने याबाबतच्या नियमात बदल करून अध्यक्षांची निवड आता आवाजी मताने किंवा हात वर करून होईल अशी सुधारणा केली आहे. भाजपाने मात्र या प्रस्तावास विरोध करताना  सरकार अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदानाने घेण्यास का घाबरते, असा सवाल करीत या सुधारणेस विरोध केला.