एजाजहुसेन मुजावर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकेकाळी दुष्काळी पट्टा म्हणून सोलापूरची राज्यभर ओळख. गेल्या काही वर्षांत मात्र कृषी क्षेत्रातील प्रगती आणि त्यास उद्योग, दळणवळणाच्या सुविधांनी साथ दिल्याने जिल्ह्याने लक्षणीय भरारी घेतली आहे. राज्यात सर्वाधिक ऊस – साखर उत्पादन, सर्वाधिक साखर कारखाने, शेतीला मिळालेली फळबाग लागवडीची यशस्वी जोड यामुळे जिल्ह्याने प्रगतीचा मार्ग धरला आहे. हा कायापालट होण्यास महाकाय उजनी धरणाचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे. दुसरीकडे पंढरपूर, अक्कलकोटसह शेजारच्या तुळजापूर, गाणगापूर आदी प्रसिध्द तीर्थक्षेत्रांमुळे सोलापूरच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळत आहे. सर्व तीर्थक्षेत्रे एकमेकांना दळणवळणाने जोडण्याचे केंद्र सरकारचे धोरण सोलापूरसाठी अनुकूल ठरत आहे.

पूर्वापार परंपरेने रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमध्ये एकूण ११ लाख ११ हजार ५०० हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी जेमतेम सव्वालाख हेक्टर क्षेत्र खरीप पिकांच्या लागवडीखाली होते. परंतु, आता उपलब्ध पाण्यामुळे खरीप क्षेत्र चार लाख हेक्टपर्यंत वाढले असून, त्यात ऊस, डाळिंब, केळी, द्राक्षे आदी नगदी पिकांमुळे शेतकऱ्यांच्या अंगणात खऱ्या अर्थाने विकासाची गंगा अवतरली आहे. यामागे स्थानिक नेतृत्वाची दूरदृष्टी, शेतकऱ्यांची जिद्द महत्त्वाची ठरली. दुष्काळाने होरपळलेला हा भाग आता टँकरमुक्त झाला आहे. येथील बोडक्या माळरानावर फळांच्या बागा बहरल्या आणि शेतकरी डाळिंबाचे सौदे करण्यासाठी थेट दिल्लीला विमानाने जाऊ लागला आहे. दिल्लीच नव्हे, तर लंडनच्या बाजारातही येथील डाळिंब, द्राक्षांना चांगला भाव मिळतो आहे. एकूणच कधीकाळी दुष्काळी म्हणून हिणवल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात कृषी, उद्योग क्षेत्रातील भरारीने प्रगतीचे वारे वाहू लागले असून, नागरिकांच्या आर्थिक स्थितीत आमूलाग्र बदल घडू लागला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेसह सर्व राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांमध्ये मिळून ३० हजार ५६८ कोटींच्या ठेवी जमा आहेत.

फळबागा.. धवलक्रांती..
फळबागांचे क्षेत्र दीड लाख हेक्टर आहे. कांदा, टोमॅटोचे क्षेत्र एक लाख हेक्टरवर आहे. तसेच इतर बागायती पिके असून, हंगामी बागायती ज्वारी, गहू, हरभरा आणि इतर पिकांचे क्षेत्रही वाढले आहे. याशिवाय घर तेथे गाय-म्हैस ही संकल्पना रुजल्यामुळे जिल्ह्यात दररोज सुमारे १५ लाख लिटर दुधाचे संकलन होते. एकेकाळच्या दुष्काळी जिल्ह्यात आता धवलक्रांती होत आहे.

उजनीचे वरदान
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनीचे पाणी आसपासच्या भागात मिळण्यासाठी तत्कालीन युती सरकारच्या काळात काही जलसिंचन योजना पुढे आल्या. त्यात नऊ मध्यम प्रकल्प आणि भीमा-सीना जोडकालव्यासह आठ उपसा सिंचन योजना आणि ८६ लघुसिंचन योजना मार्गी लागल्या आहेत. ११६५ पाझर तलाव आणि ७२२ कोल्हापूर पध्दतीचे बंधारे आहेत. कालवा प्रवाही पध्दतीनेही सिंचन होत आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात बीबी दाराफळसारख्या भागात लोकमंगल उद्योग समूहाचे प्रमुख, आमदार सुभाष देशमुख यांनी केलेली कामे उल्लेखनीय आहेत. सांगोला, माळशिरस आणि करमाळा या तालुक्यांतील शेतीला लगतच्या जिल्ह्यातून धरणांचे पाणी मिळते. यातूनच हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून उसाच्या माध्यमातून वाढलेल्या साखर उद्योगात सोलापूर जिल्हा राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात अग्रेसर ठरला आहे. अलीकडे पाण्याच्या उपलब्धतेमुळे उसाच्या शेतीत लक्षणीय वाढ झाली आणि जिल्ह्यातील साखर कारखान्यांची संख्या तब्बल ३८ वर पोहोचली आहे. गेल्या पाच-दहा वर्षांत हे बदल दिसून येत आहेत. माढा तालुक्यातील खैराव हे छोटेसे गाव या बदलाचे प्रातिनिधिक उदाहरण आहे.

पर्यटनाला चालना
तीर्थक्षेत्र तथा पर्यटन क्षेत्र म्हणून पंढरपूर, अक्कलकोट तसेच लगतचे तुळजापूर, गाणगापूर, विजापूर आदी प्राचीन, धार्मिक व ऐतिहासिक स्थळे सोलापूरच्या पर्यटन विकासाला चालना देतात. नान्नज येथे माळढोक अभयारण्याला देशभरात प्रसिद्धी मिळाली आहे. अलीकडे वंदे भारत एक्सप्रेसही सुरू झाली आहे.

उणीव काय?
वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये सुमारे २३०० कोटी खर्चाचा विकास आराखडा जिल्हाधिकारी मििलद शंभरकर यांनी तयार केला आहे. अक्कलकोटसाठी २६८ कोटी खर्चाचा विकास आराखडा तयार आहे. त्याच्या अंमलबजावणीची मात्र प्रतीक्षा आहे. तसेच सोलापूर जिल्ह्याला विमानसेवेची उणीव भासत आहे.

उद्योगविस्तार : सोलापूर हे एकेकाळी गिरणगाव म्हणून परिचित होते. मुंबई-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गासह इतर राष्ट्रीय महामार्गाचे जाळे याच सोलापुरातून गेले आहे. रेल्वेमार्गानेही सोलापूरला देशातील अनेक महानगरांना जोडले आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायाला अनुकूलता आहे. सोलापुरी चादर, टॉवेल, बेडशिटसारखे वस्त्रोद्योग सोलापूरची नाममुद्रा टिकवून आहेत. यात काळानुरूप बदल होऊन क्लस्टर योजनांच्या माध्यमातून कायापालट करण्याची धडपड तरूण पिढी करीत आहे. हजारो महिला कामगारांच्या हक्काचा विडी उद्योग तग धरून आहे. गारमेंट उद्योग प्रगतीच्या वाटेने मार्गस्थ झाला आहे. अक्कलकोट रोड आणि चिंचोळीसह जिल्ह्यात एकूण सात एमआयडीसी आहेत. टेंभुर्णी, करमाळा, मंगळवेढा, बार्शी, कुर्डूवाडी येथील एमआयडीसीने उद्योग निर्मितीसाठी भूखंड वितरीत केले आहेत. अक्कलकोट रोड व चिंचोळी भागात दोन हजारांपेक्षा अधिक उद्योग आहेत. यात २५ पेक्षा जास्त मोठे उद्योग प्रकल्प आहेत.

साखर अन् इथेनॉल पट्टा
अलीकडे काही वर्षांत सोलापुरात साखर कारखानदारी झपाटय़ाने वाढत असून, यापूर्वी बंद पडलेले काही साखर कारखानेही धूळ झटकून पुन्हा सुरू झाले आहेत. २०२८-१९ साली ३१ साखर कारखान्यांनी एक कोटी ६१ लाख २८ हजार ५२५ टन ऊस गाळप केला होता. २०२१-२२ साली ३३ साखर कारखान्यांनी दोन कोटी २९ लाख ७२ हजार २५० टन इतका उच्चांकी ऊस गाळप केला होता. चालू गळीत हंगामात ३८ साखर कारखान्यांकडून जवळपास पावणेदोन कोटी टन ऊस गाळप होण्याची अपेक्षा आहे. यात उत्पादित होणारी साखर तेवढय़ाच क्विंटलच्या प्रमाणात आहे. सोलापूर जिल्ह्यात साखर उत्पादनासह १२ कारखान्यांमध्ये मद्यार्क प्रकल्पांतर्गत इथेनॉलचे उत्पादन घेतले जाते. २०२१-२२ सालच्या गळीत हंगामात १८ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली आहे. मागील २०२२-२३ सालच्या हंगामात १९ कोटी ९५ लाख लिटर एवढे इथेनॉल उत्पादित झाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Progress through agriculture industries state solapur author eijah hussain mujawar amy
First published on: 23-02-2023 at 04:16 IST