महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास अथवा प्रचारासाठी कोणत्याही पक्षाच्या व्यासपीठावर जाण्यास पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मनाई केली आहे.
मनसेचे जिल्हा संघटक सचिन डफळ यांनी ही माहिती दिली. जिल्हा संपर्क अध्यक्ष सुनील बांभुळकर व संतोष धुरी यांनी याबाबतचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही उमेदवाराचा प्रचार केल्यास किंवा व्यासपीठावर गेल्यास पक्षाच्या वतीने कारवाई करण्याचे आदेश असल्याचे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे. अर्थात, राज ठाकरे यांचा पुढील आदेश येईपर्यंत कोणाचाही प्रचार करता येणार नाही, असेही डफळ यांनी म्हटले आहे.
मनसे राज्यात काही जागा लढवत असले तरी पक्षाने नगर दक्षिण किंवा शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही. उमेदवारी अर्ज दाखल होऊन इतर पक्षांच्या उमेदवारांचे प्रचार जोरात सुरू झाले आहेत. मनसेने या लोकसभा निवडणुकीत जिल्हय़ात काय भूमिका घ्यावी याविषयी पदाधिकारी व कार्यकर्त्यांत संभ्रमावस्था होती. नगर मनपामध्ये पक्षाचे ४ नगरसेवक आहेत. स्थायी समितीचे सभापतिपदही पक्षाकडे आहे. तर एक पंचायत समिती सदस्य आहे. लोकसभा निवडणुकीत काय भूमिका घ्यावी, याबाबतच्या आदेशाची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा होती. इतर पक्षांचे उमेदवारही मनसेकडे गळ टाकून होते. कोणती भूमिका घ्यावी यासाठी बैठक घेण्याचेही घाटत होते. परंतु निर्णय झालेला नव्हता.
त्यामुळे पदाधिकारी, नगरसेवकांनी आपापल्या पद्धतीने काही उमेदवारांशी संधान बांधले होते. मनपातील सत्तेत मनसेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेला आहे. मनपा निवडणुकीत काही ठिकाणी सेनेच्या विरोधात मनसेला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीचा हात दिला होता, त्यामुळे लोकसभेबाबत प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी होती. त्यातून स्थानिक पातळीवरच पेच निर्माण झाल्यासारखी परिस्थिती होती. आता अखेरच्या क्षणी पक्षाने कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायचा नाही, असा आदेश दिला आहे. प्रत्यक्षात तो कसा पाळला जातो, याकडे लक्ष राहील.