आगामी आर्थिक वर्षांसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या विकास आराखडय़ात सुमारे शंभर कोटी रुपयांची वाढ करीत २२७ कोटी रुपयांचा विकास आराखडा जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची बैठक मंगळवारी येथे झाली. संध्याकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत २०१५-१६ या आर्थिक वर्षांसाठीच्या विकास आराखडय़ावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मंडळाने यापूर्वी मंजूर केलेला आराखडा १२७ कोटी १६ लाख रुपयांचा होता. त्यामध्ये भरीव वाढ करीत २२७ कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखडय़ाला मंडळाने मंजुरी दिली. जिल्ह्यातील रस्तेविकास, पाणीपुरवठा, पर्यटनवृद्धी, आरोग्य, शिक्षण इत्यादीसाठी त्यामध्ये तरतुदी करण्यात आल्या आहेत.
माजी मंत्री व आमदार उदय सामंत, भास्कर जाधव, सदानंद चव्हाण, राजन साळवी, संजय कदम, विधान परिषद सदस्य हुस्नबानू खलिफे, जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्यासह नियोजन मंडळाचे सदस्य आणि जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय काळम पाटील इत्यादी वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असली तरी राज्याच्या चालू आर्थिक वर्षांच्या सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या आराखडय़ात शासनाने कोणतीही कपात केली नसल्याचे पालकमंत्री वायकर यांनी बैठकीच्या सुरुवातीला नमूद केले. त्यानंतर झालेल्या चर्चेत मूळ आराखडय़ाच्या गाभा क्षेत्रांतर्गत कृषी व संलग्न सेवांसाठी १३ कोटी १६ लाख रुपये, ग्रामीण विकासासाठी १४ कोटी ६१ लाख रुपये आणि सामाजिक व सामूहिक सेवांसाठी ५२ कोटी ७० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर बिगर गाभा क्षेत्रांतर्गत योजनांपैकी परिवहनासाठी ३२ कोटी रुपये, सामान्य आर्थिक सेवांसाठी ४ कोटी ३० लाख रुपये, नावीन्यपूर्ण योजनांसाठी ६ कोटी ३६ लाख रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. सुधारित वाढीव आराखडा मंजूर झाल्यानंतर या योजनांच्या शीर्षनिहाय खर्चात वाढ होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर अनुसूचित जाती उपयोजनेचा आगामी आर्थिक वर्षांसाठीचा १३ कोटी ४३ लाख रुपयांचा प्रारूप आराखडा सुमारे साडेतीन कोटी रुपयांनी वाढवून २० कोटी रुपयांचा करण्यात आला आहे.
दरम्यान, वायकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या या पहिल्याच बैठकीत माजी मंत्री भास्कर जाधव यांनी कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवला. ‘मंडळाच्या आजच्या बैठकीत वेगळाच अनुभव आला. सरकार अजून रांगायला शिकतेय,’ अशा शब्दांत या बैठकीचे वर्णन करून पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, आम्हाला दिलेली विषयपत्रिका एक आणि सभागृहातील वेगळीच असल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळी सुरू झालेली बैठक संध्याकाळपर्यंत चालूच राहिली. चालू वर्षीच्या विकास आराखडय़ात कपात झाली नसल्याचे पालकमंत्री सांगत असले तरी मूळ आराखडा सुमारे दीडशे कोटी रुपयांचा होता. आता तो १२७ कोटी रुपयांचा झाला आहे. याचा अर्थ शासनाने त्यामध्ये सुमारे २० टक्के कपात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या कार्यपद्धतीवरही जाधव यांनी टीका केली.