सोलापूर : सनातन धर्म म्हणजे देशाला लागलेली कीड आहे, अशी टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ सोलापुरात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला.
टिळक चौकात झालेल्या या आंदोलनात आव्हाड यांच्यावर हिंदू धर्माचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी सनातन हिंदू धर्माचा जयजयकार करण्यात आला. या आंदोलनात सिध्दार्थ मंजेली, श्रीपाद इराबत्ती, अनिल कंदलगी, प्रशांत फत्तेपूरकर, सतीश महाले आदींचा सहभाग होता.
हेही वाचा >>> पालकमंत्री दीपक केसरकर यांना हटवण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात निदर्शने
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याचा दाखला देत, जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्मावर टीका केली होती. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी मुंबईत बोलावून त्यांचे कार्यक्रम आखले जात आहेत. हिंदू धर्म आणि सनातन धर्म पूर्णपणे वेगळा आहे. पाच हजार वर्षांहून अधिक काळ सनातन धर्माने समाजातील ९५ टक्के बहुजन वर्गाला शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. याच सनातन धर्मावर आगरकर, फुले आदी सुधारणावादी महापुरूषांनी टीका केली होती, असे जितेंद्र आव्हाड यांनी सनातन धर्माच्या विरोधात भाष्य करताना नमूद केले होते.