लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर: उन्हाळ्याचे चटके चांगल्याच जाणवत असताना दक्षिण सोलापूर तालुक्यात सीना नदीसह कुरूल कालव्यात पाणी शिल्लक नाही. त्यामुळे परिसरातील शेतीपिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. मुक्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही भेडसावत आहे. यासंदर्भात मागणी करूनही सीना नदीत आणि कुरूल कालव्यात शेवटच्या टोकापर्यंत पाणी सोडले जात नसल्याने भाजपचे नेते, आमदार सुभाष देशमुख यांनी जलसंपदा विभागाच्या उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणासमोर शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर मंत्रालय आणि प्रशासकीय स्तरावर तातडीने हालचाली झाल्या. अखेर येत्या आठवडाभरात पाणी सोडण्याच्या प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सत्ताधारी आमदार असूनही आंदोलन करण्याची वेळ आल्याबद्दल देशमुख यांनी खंत व्यक्त केली.
आमदार सुभाष देशमुख यांनी शेकडो शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन सुरू केले होते. सीना-भीमा संघर्ष समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, संदीप टेळे, रामचंद्र बिराजदार, पंडित बुलगुंडे, राजूर गावचे सरपंच लक्ष्मण गडदे, औरादचे सरपंच शांतकुमार गडदे, सुभाष बिराजदार, सिध्दाराम ढंगापुरे, श्रीशैल बिराजदार, यतीन शहा आदींचा त्यात समावेश होता. उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे आणि उपविभागीय अधिकारी शिरीष जाधव यांनी आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक अधिक आक्रमक झाले होते. यावेळी आमदार देशमुख यांनी जलसंपदा विभागाच्या कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
एकीकडे उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले जात असताना दुसरीकडे सीना नदी कोरडीच राहिली आहे. उन्हाळ्यात सिना नदीकाठच्या शेतकरी आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. पाणी सोडले तरी ते दक्षिण सोलापूर तालुक्यात शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतच नाही. असे प्रकार वारंवार जाणीवपूर्वक घडत असल्याचा आरोप त्यांनी केला. आपण सत्तेवर असतानाही आंदोलन करावे लागते. मात्र हे आंदोलन शासनाच्या विरोधात नाही तर प्रशासनाच्या विरोधात असल्याचे आमदार देशमुख यांनी स्पष्ट केले. याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे थेट संपर्क साधून त्यांचे लक्ष वेधले. तेव्हा भ्रमणध्वनीचा स्पिकर मोठा करून आंदोलक शेतकऱ्यांशी फडणवीस यांनी संवाद साधला आणि तात्काळ पाणी सोडण्याचे आश्वासन दिले.