अहिल्यानगर : मध्यपूर्वेत कोणत्याही ठोस कारणाशिवाय युद्ध लादल्याचा आरोप करत पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद या संघटनांच्या पुढाकाराने अमेरिका आणि इस्त्रायलविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. शहरातील दिल्लीगेट भागात हे आंदोलन आज, गुरुवारी करण्यात आले. आंदोलकांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या प्रतिमांना जोडे मारून व त्या पायाखाली तुडवत संताप व्यक्त केला तसेच ट्रम्प व नेतन्याहू यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

आंदोलनात ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ॲड. अमित थोरात, वीरबहाद्दूर प्रजापती, सचिन कुक्कडवाल, संतोष खामकर, ओम कदम, पोपट शेळके, ॲड. लक्ष्मणराव पोकळे, पोपट भोसले, धनंजय मडके, कैलास पठारे, अशोक भोसले यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी सहभागी होते.

आंदोलनादरम्यान ॲड. कारभारी गवळी यांनी निषेध नोंदविताना सांगितले की, अमेरिका आणि इस्त्रायलच्या आक्रमक धोरणांमुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. या युद्धाचे परिणाम केवळ मानवजातीपुरते मर्यादित राहणार नसून संपूर्ण सजीव सृष्टीवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. विशेषतः तेलविहिरींवरील संभाव्य हल्ल्यांमुळे पर्यावरणीय संतुलन बिघडण्याचा धोका असून हवा व पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढू शकते तसेच ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. जगातील सुज्ञ नागरिकांनी शांततेसाठी पुढाकार घ्यावा. अमेरिका आणि इस्त्रायलने विज्ञान-तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली असली तरी मानवतावाद आणि सजीव सृष्टीबद्दलची संवेदनशीलता त्यांनी गमावली.

ॲड. अशोक सब्बन यांनी, अमेरिका हुकूमशाही पद्धतीने स्वतःच्या स्वार्थासाठी इतर राष्ट्रांवर बंधने लादत असल्याचा आरोप केला. युद्धाच्या माध्यमातून खनिज संपत्ती आणि पर्यावरणाची मोठी हानी होत असून त्याचा फटका जगातील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. जगाला विनाशाकडे नेणाऱ्या या युद्धाचा शेवटी माणसालाच फटका बसणार असेल, तर या सामर्थ्याचा उपयोग काय?

प्रकाश थोरात यांनी इराणमधील मुलींच्या शाळेवर बॉम्बहल्ला करून निर्दोषांची हत्या केल्याचा आरोप करत निषेध केला. चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याऐवजी युद्धाचा मार्ग अवलंबून संपूर्ण मानवजातीला ओलीस ठेवण्याचे काम अमेरिका आणि इस्त्रायल करत असल्याचे त्यांनी नमूद केले. हे युद्ध थांबवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनीही मत व्यक्त करताना भ्रष्टाचार, स्वार्थ, धर्मांधता आणि अनागोंदी यामुळे मानवी मूल्ये खालावत चालल्याची खंत व्यक्त केली. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी जागतिक स्तरावर विवेकनिष्ठ, पारदर्शक आणि जबाबदार शासनपद्धतीची अंमलबजावणी अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.