कराड : मुंबईत झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी मराठा इतिहासातील पराक्रमी व्यक्तिमत्त्व महाराणी ताराराणी यांच्याबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद कराड तालुक्यातील तळबीड येथे उमटले आहेत. हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी मोहिते घराण्याचे वंशज व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येत निषेध नोंदवला आणि संबंधित जैन मुनीवर कठोर कारवाईची मागणी केली.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे तळबीड हे गाव ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. मराठा साम्राज्याच्या घडणीत या भूमीचा मोलाचा वाटा असून, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कालखंडाशी या गावाचा घनिष्ठ संबंध आहे. महाराणी ताराराणी या त्यांच्या कन्या असल्याने तळबीडकरांसाठी त्यांचे स्थान विशेष आदराचे आहे.

जैन मुनींच्या वक्तव्याच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, महाराणी ताराराणी या केवळ ऐतिहासिक व्यक्ती नव्हेत, तर मराठा साम्राज्याच्या संघर्षमय काळातील नेतृत्व करणाऱ्या धैर्यशील रणरागिणी होत्या. त्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी आणि शिवाजी महाराजांच्या सुन होत्या.

औरंगजेबाच्या दीर्घ आक्रमणाला त्यांनी ठामपणे तोंड देत मराठा साम्राज्य टिकवून ठेवले, हा इतिहास सर्वश्रुत असल्याचे ग्रामस्थांनी ठामपणे सांगितले. तसेच इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या संशोधनाचा दाखला देत, ताराराणींचे व्यक्तिमत्त्व लढवय्या परंपरेत घडले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर इटालियन- अमेरिकन इतिहासकार रिचर्ड इटन यांनीही त्यांच्या पराक्रमाचे कौतुक केले असल्याचे नमूद करण्यात आले.

मोहिते घराण्याचे प्रतिनिधी विक्रमसिंह मोहिते म्हणाले, महाराणी ताराराणी या आमच्या घराण्याचा अभिमान आहेत. कोणतेही ठोस ऐतिहासिक पुरावे नसताना, त्यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणे अयोग्य आहे. संबंधित आचार्यांनी तत्काळ आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि जाहीर माफी मागावी. या प्रकरणात ग्रामस्थांनी पुढील पाऊल उचलण्याचा निर्णय घेत तळबीड पोलीस ठाणे, सातारा जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य शासनाकडे निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घालून अशा प्रकारच्या वक्तव्यांना आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, इतिहासाची विकृतीकरण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे. आवश्यक असल्यास यासाठी विशेष कायदा करण्याची मागणीही पुढे येत आहे. आचार्य नयन पद्मसागर यांनी माफी न मागल्यास कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा इशारा तळबीड ग्रामस्थांनी दिला आहे.