दिल्लीतल्या जंतर-मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं ते देशभरात चर्चेचा विषय ठरलं. कारण CJP चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं होतं. तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाही झाला. ज्यानंतर हे आंदोलन संपलं. यानंतर जेन झीचा विषय चर्चेत आला, त्यांना नावंही ठेवली गेली आणि त्यांच्यावर स्तुतीसुमनंही उधळण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेन झींशी संवाद साधला त्यावेळी आंदोलक विद्यार्थी आणि जेन झींबाबत महत्त्वाचं विधान केलं.
मोहन भागवत जेन झींच्या संवादात काय म्हणाले?
जेन झी म्हणजे काय? ते आपलेच लोक आहेत. जर त्यांनी एखाद्या गोष्टीसाठी आंदोलन केलं तर ते चुकीचं कसं? त्यांचं ऐकून घ्यायला हवं. जेन झी ने आंदोलन केलं म्हणून ते आंदोलक देश विरोधी किंवा अँटी नॅशनल ठरत नाहीत असं महत्त्वाचं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं. आंदोलन करणं चुकीचं आहे का? असं विचारलं असता मोहन भागवत म्हणाले आंदोलन हा संवादाचाच एक प्रकार आहे. आपण इथे बसून जसं बोलतो आहोत. त्यात मला मुद्दे समजत आहेत, तुम्हाला समजत आहेत. नाहीतर वाद होईल. एखादी गोष्ट सुटण्यासारखी नसेल तर वाद होईल मी तुम्हाला खेचून आणेन. हे आधी करा असं करेन. लोकशाहीत आंदोलन करणं हे काही गैर नाही. आंदोलन करण्यात काहीही गैर नाही. पण त्याचा उपयोग हा कुठल्याही विभाजनासाठी होता कामा नये. जेन झी ने जे आंदोलन केलं, त्याचा उद्देश योग्य होता. भारताच्या शिक्षण धोरणात बऱ्याच गोष्टी होणं गरजेचं आहे, त्या होत नाहीत, त्याची चर्चा होते. त्यामुळे संवाद हा असलाच पाहिजे. संवाद साधून जर गोष्टी साध्य होत नसतील काय करायचं हा भाग पुढचा आहे, असं मत भागवत यांनी व्यक्त केलं.
आम्ही जेन झींच्या वयाचे होतो तेव्हा..
मोहन भागवत पुढे म्हणाले, जेन झींबाबत मला जे वाटतं की आम्ही जेव्हा जेन झींच्या वयाचे होतो तेव्हा आमच्या पिढीचा स्वभाव असा होता की जे मोठे आम्हाला सांगतील ते आम्ही ऐकत होतो. आम्ही प्रश्न विचारत नव्हतो. आता जेन झी, जेन अल्फा प्रश्न विचारतात आणि त्यांना तर्कशुद्ध उत्तर हवं असतं. शिवाय त्यांना प्रेमही हवं असतं. प्रेम असेल तरच उत्तरं मिळतात. जर परिचय नसेल तर तुमचा माझा काय संबंध असंही विचारलं जातं. इंग्रजीत डिबेट असा शब्द आहे, पण आपल्याकडे शब्द आहे तो शास्त्रार्थ. त्यात पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष असतो ज्यामुळे एक नवा पैलू समोर येतो असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. जेन झी ने आंदोलन करु नये असं माझं म्हणणंच नाही. पण ते कसं करायचं त्याची पद्धत काय ते सांगितलं गेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याबाबत सांगितलं आहे, ते वाचलं पाहिजे. आंदोलन कुणाच्याही विरोधात होण्यापेक्षा ते यंत्रणा, धोरण सुधारणेसाठी झालं पाहिजे.
