सोलापूर : प्रखर उन्हाळा असूनही सश्रद्ध भावनेने महिनाभर कडक रोजे केल्यानंतर मंगळवारी सोलापुरात मुस्लीम समाजाने ईद-ऊल-फित्र अर्थात रमजान ईद उत्साही, आनंदी आणि मंगलमय वातावरणात साजरी केली. सलग दोन वर्षे करोना महामारी आणि कठोर निर्बंधांमुळे ईदचा सार्वत्रिक आनंद लुटता आला नव्हता. यंदा निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रथमच ईदचा उत्साह दिसून आला.
ईदनिमित्त एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. विशेषत: हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांना भेटून ईदचा आनंद लुटला. दिवसभर घरोघरी शिरखुम्र्याचा आस्वाद घेण्यासाठी मित्र, स्नेही, नातेवाईक आणि पाहुणे मंडळींची रेलचेल होती.
सकाळी सर्व प्रमुख ईदगाह आणि मशिदींमध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात आली. दोन वर्षे करोना महामारी व निर्बंधांमुळे ईदगाह आणि मशिदींमध्ये नमाज पठण करता आली नव्हती. त्यामुळे एकमेकांना समक्ष भेटून शुभेच्छा देणेही अशक्य झाले होते. आज मात्र एकमेकांना भेटून ईदचा आनंद लुटला गेला. इलमगीर ईदगाह (पानगल प्रशाला मैदान), नवीन आलमगीर ईदगाह (होटगी रोड), आदिलशाही ईदगाह (जुनी मिल पटांगण), अहले हदीस ईदगाह (शिवछत्रपती रंगभवन) आणि आसार मैदान (भुईकोट किल्ला) तसेच सर्व मशिदींमध्यै सामूहिक नमाज पठण करण्यात आली.
होटगी रोडवरील नवीन आलमगीर ईदगाहवर शहर काझी मुफ्ती अहमदअली काझी यांनी नमाजाचे सारथ्य केले. अलिकडे मुस्लीम समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र जाणीवपूर्वक रचले जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. मुस्लीम तरुणांनो तुम्हाला कोणीही कितीही भडकावण्याचा प्रयत्न केला तरीही भडकू नका, कोणत्याही जाळय़ात अडकू नका, त्याचे उत्तर आपण जरूर देऊ, पण हातात दगड घेऊन नव्हे, तर शिक्षण, पुस्तक आणि लेखणीने उत्तर देऊ, असे त्यांनी खुदबा पठण करताना नमूद केले.