जनहिताच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. गावाच्या सर्वागीण विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, त्यासाठी आवश्यक असणारा निधी आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रममंत्री अनंत गीते यांनी रविवारी येथे केले. नाबार्ड अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सावित्री नदीवर बांधण्यात आलेल्या लोहारमाळ ते तुभ्रे या पुलाचे उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार तथा रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री प्रकाश मेहता उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्रिमहोदय म्हणाले की, नाबार्ड योजनेतून हा पूल मंजूर झाला. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने येथील जनतेला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल असे सांगून ते म्हणाले की, केंद्र सरकारला दोन वष्रे पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने विकास पर्व साजरा करीत आहोत. दोन वर्षांत केलेली जनहिताची कामे थेट जनतेपर्यंत पोहोचवावीत असे केंद्र सरकारचे धोरण आहे. जनतेच्या योजना आणल्या जातात. त्या योजना जनतेला माहिती असणे आवश्यक आहे. कोकणात जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न केला जाईल. पोलादपूरसारख्या दुर्गम तालुक्यातील जनतेची कामे जलदगतीने केली जातील. प्रत्येक ग्रामपंचायतीला केंद्राकडून ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचेही या वेळी त्यांनी सांगितले. या प्रसंगी पालकमंत्री प्रकाश मेहता म्हणाले की, गतिमान कार्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्याचेच हे उदाहरण असून हा पूल जनतेला नक्कीच लाभदायी ठरेल. ‘मेक इन इंडिया’, ‘मेक इन महाराष्ट्र’, ‘अच्छे दिन’ सध्या केंद्र सरकारने देशात गेल्या दोन वर्षांत सर्वसामान्य माणसापर्यंत हा कार्यक्रम सर्वापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जिद्द, चिकाटी आणि वचनपूर्ती पूर्ण करण्याचे काम केले जात आहे. राज्य सरकार दुर्गम भागांतील खेडी व वाडय़ांत, ग्रामीण भागात अनेक योजना नेण्याचे काम करीत आहे. हा पूल पूर्ण करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचे या वेळी मंत्रिमहोदयांनी अभिनंदन केले. या वेळी आमदार भरतशेठ गोगावले यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास आमदार भरतशेठ गोगावले, पोलादपूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा अश्विनी गांधी, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे, पंचायत समिती सभापती अर्चना कुंभार, लोहारचे सरपंच प्रदीप सुर्व, तुभ्रेचे सरपंच गणेश उतेकर व अन्य ग्रामपंचायतीचे सरपंच, परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सातपुते यांनी मंत्रिमहोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.