पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारात काम करणाऱ्या व सध्या बेपत्ता असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे आता भांडाराच्या प्रवेशद्वाराशी आक्रंदन सुरू झाले आहे, तर मृतांचा अधिकृत आकडा १९ देण्यात आलेला असतांना २३ शवपेटय़ा कशा मागविण्यात आल्या, हा प्रश्न नव्याने निर्माण झाला आहे.
पुलगाव पोलिसांकडे अधिकृत १९ मृतांची नोंद करण्यात आली. मात्र, भांडारात कार्यरत अनेक कर्मचाऱ्यांचे आप्त त्यांच्या कुटुंबातील सदस्य बेपत्ता असल्याचे सांगत आहेत. भांडाराच्या प्रवेशदाराशी एका प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. त्याच्याकडे हे आप्त आक्रंदन करीत विचारणा करतात. बुधवार व गुरुवार, या दोन दिवसात ३०-४० कुटुंबांनी या अधिकाऱ्याकडे विचारणा केली. संबंधित बेपत्ता कर्मचाऱ्याचे नाव व वर्णन लिहून घेतले जाते. मात्र, त्यापुढे उत्तर मिळत नाही. सध्या भयावह आगीत भक्ष्यस्थानी पडलेल्या इमारतीचा ढिगारा उपसणे सुरू आहे. हे एक दिव्यच समजले जाते. याखाली आणखी मृतदेह सापडण्याची शक्यता नाकारली जात नाही. दरम्यान, माजी सैनिकी अधिकाऱ्यांच्या एका संघटनेने नवीच शंका उपस्थित केली आहे. मृतांचा आकडा तर १९ आहे, तर मग २३ शवपेटय़ा का मागविण्यात आल्या, असा प्रश्न विचारला आहे. पोलिसांकडे नव्याने मृत कर्मचाऱ्यांची नोंद झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.