प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी शाळेकडे निघालेल्या सुर्ली (ता. कराड) येथील शिक्षिकेला प्रवासी म्हणून जीपगाडीत बसवून घेऊन सुर्ली घाटात मारहाण करून सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेणाऱ्या दोघांना येथील प्रथमवर्ग न्या. माणिकराव सातव यांनी ३ वष्रे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तुकाराम ऊर्फ नाना बाबू मुंढे, अक्काताई तुकाराम मुंढे (रा. भोंगळेवाडी, ता. धारूर, जि. बीड) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
शमीम मणियार या सुर्ली (ता. कराड) येथील शाळेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत. २६ जानेवारी २०१४ रोजी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी शाळेकडे जात होत्या. या वेळी एका जीपच्या चालकाने त्यांना प्रवासी म्हणून गाडीत बसवून घेतले. जीप सुर्ली घाटात गेल्यानंतर जीपमधील तुकाराम ऊर्फ नाना बाबू मुंढे व अक्काताई तुकाराम मुंढे या दोघांनी मणियार यांना धमकावत अंगावरील दागिने काढून देण्यासाठी मारहाण केली. त्यामुळे भीतीने मणियार यांनी अंगावरील दागिने काढून मुंढे यांच्या हातात दिले. त्यानंतर मणियार यांना गाडीतून घाटातच सोडून तुकाराम व अक्काताई मुंढे यांनी जीपसह पोबारा केला होता. याबाबतचा गुन्हा नोंद कराड ग्रामीण पोलिसात दाखल झाला होता. सहपोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. या खटल्याची सुनावणी येथील प्रथमवर्ग न्यायालयाचे न्या. माणिकराव सातव यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे अॅड. नितीन नरवाडकर यांनी पाच साक्षीदार तपासले. सरकार पक्षाने सादर केलेला पुरावा व युक्तिवाद ग्राह्य मानून न्या. सातव यांनी तुकाराम मुंढे व अक्काताई मुंढे या दोघांना दोषी धरून ३ वष्रे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.