अहिल्यानगर : विषारी दारूने २२ जणांचा बळी घेतल्याच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील घटनेत दारूत मिसळलेले मिथेनॉल जीवघेणे ठरले. यानिमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यात ९ वर्षांपूर्वी विषारी दारुने ९ जणांचा बळी गेल्याच्या घटनेला उजाळा मिळाला. त्यातही मिथेनॉलयुक्त वेस्ट सॉल्व्हंटचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यावेळी दारूत मिसळण्यासाठीचे मिथेनॉल पुण्यातून अहिल्यानगरमध्ये आणले गेले होते.

अहिल्यानगरमधील पांगरमल येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत फेब्रुवारी २०१७ मध्ये विषारी दारूने नऊ जणांचा बळी घेतल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन जणांना कायमचे अपंगत्व आले. या दारूत वापरले गेलेले मिथेनॉल पुण्यातूनच आणले गेले, असे राज्य गुन्हे अन्वेषण शाखेच्या (सीआयडी) त्यावेळच्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर नऊ वर्षांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील घटना घडली. पण दारू तयार करण्यासाठी मिथेनॉलचा वापर अहिल्यानगरमधील घटनेनंतरही थांबला नाही, हेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील घटनेमुळे स्पष्ट झाले.

पांगरमल येथील गुन्ह्याचा सीआयडीने तपास करून १० एप्रिल २०१७ रोजी न्यायालयात २० आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले. हा खटला मात्र अद्याप उभा राहिलेला नाही. दरम्यानच्या काळात या गुन्ह्यातील सर्व आरोपींची जामिनावर मुक्तता झाली.

या गुन्ह्यातील २० आरोपींपैकी एकाने गुन्ह्यातून वगळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयाकडे अर्ज केला आहे. अन्य एका आरोपीला गुन्ह्यातून वगळण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे तर तीन आरोपींचा मृत्यू झाला आहे. दोघांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट काढण्यात आलेले आहे. या व्यतिरिक्त अन्य आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत.

पांगरमलच्या घटनेत ‘मकोका’ अन्वये कारवाई करण्यात आली. त्यावेळी ‘मकोका’ न्यायालय नाशिकला होते. तेथे आरोपपत्र सादर करण्यात आले. नगरमध्ये ‘मकोका’ न्यायालय सुरू झाल्यानंतर आरोपपत्र नगरमध्ये वर्ग करण्यात आले.

आरोपपत्रात काय?

सीआयडीचे कोल्हापूर परिक्षेत्राचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जी. ए. मोरे यांनी तपासानंतर न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार विषारी दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरिट शिरपूर (धुळे) येथून तर मिथेनॉलयुक्त वेस्ट सॉल्व्हंट पुण्यातील व्यावसायिकाकडून एका औषध कंपनीच्या नावाने मागवले गेले. विषारी दारूच्या बाटल्यांवर कंपन्यांचे बनावट लेबल वापरण्यात आले. त्यासाठी भंगारातील दारूच्या रिकाम्या बाटल्या विकत घेण्यात आल्या. जिल्हा सरकारी रुग्णालयातील उपहारगृह व कल्याण रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये दारू तयार करून ती बाटल्यांमध्ये भरण्यात आली. ही दारू आरोग्यास अपायकारक आहे, हे माहिती असतानाही तिची बेकायदा विक्री व वाहतूक केली, ती प्यायला देऊन नऊ व्यक्तींच्या मृत्यूस, दोन व्यक्तींना कायमचे अंधत्व व एकास अर्धांगवायू येण्यास तर इतरांना जखमी होण्यास आरोपी कारणीभूत ठरले.

सर्व आरोपींना जामीन

पांगरमल गुन्हेतील सर्व २० आरोपींची न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली. या प्रकरणातील खटल्याची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही. काही आरोपींवर न्यायालयात दोषारोपपत्र निश्चित करण्यात आले आहेत. -अर्जुन पवार, अतिरिक्त सरकारी वकील.

खटल्याची सुनावणी अद्याप सुरू नाही

पांगरमलच्या गुन्ह्याच्या खटल्याची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही. न्यायालयाने तीन आरोपींविरुद्ध अजामीनपत्र वॉरंट काढले आहे. एका आरोपीचा नाशिकच्या कारागृहात मृत्यू झाला. आणखी एका मृत आरोपीच्या मृत्यूचा दाखला मिळत नाही. एकूण तीन आरोपींचा मृत्यू झाला आहे. -सुधीर बाफना, आरोपीचे वकील