मुंबई : अमिताभ गुप्ता आणि जालिंदर सुपेकर या दोन आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात पुणे शहर पोलिसांनी दिलेल्या शस्त्र परवान्यांमध्ये काहीही बेकायदा झालेले नसून सर्व परवाने हे शस्त्र अधिनियम १९५९ व शस्त्र नियम २०१६ मधील अटी व शर्ती व तरतुदींचे पालन करुनच प्रदान केले आहेत, असे गृहविभागाने स्पष्ट केले आहे. याता निर्दोषत्व मिळाले असले तरी भारतीय पोलीस सेवेतील हे दोन्ही अधिकारी विविध गंभीर आरोपांमुळे दोन वर्षापासून कमी महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.
पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेच्या आत्महत्येनंतर पुणे पोलीसांनी दिलेले शस्त्र परवाने चर्चेत आले हाेते. तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळातील सर्व शस्त्र परवान्यांची चौकशी करण्याची मागणी झाली होती. वैष्णवीचा पती व दीर यांचे नात्याने मामा असलेले जालिंदर सुपेकर यांनी या दोघा भाच्यांना शस्त्र परवाना मिळवण्यास मदत केल्याचाही आरोप झाला होता.
यासंदर्भात अतारांकित प्रश्नोत्तराची यादी विधिमंडळाने नुकतीच प्रसिद्ध केली. पुणे शहर पोलीस आयुक्तालयामधील अमिताभ गुप्ता या अधिकाऱ्यांच्या सेवा कालावधी दरम्यान एकुण ४३३ परवाने मंजूर केले आहेत. सदर परवाने देताना संबधित परवाना प्राधिकाऱ्यांनी शस्त्र अधिनियम १९५९ मधील शर्ती व तरतुदींचे पालन करुनच परवाने प्रदान केलेले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये म्हटले आहे.
जालिंदर सुपेकर आणि त्यांचे मेहुणे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शशिकांत चव्हाण यांनी हजारो कोटींच्या स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचेही आरोप झाले होते. सुपेकर यांच्या सदंर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. शशिकांत चव्हाण यांच्या मालमत्तांची चौकशी केली. मात्र चव्हाण यांची मालमत्ता असंपदा असल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे चौकशी बंद करण्यात आल्याचे गृहविभागाने उतरामध्ये स्पष्ट केले आहे.
हगवणे बंधुंच्या शस्त्र परवान्यांना मदत केल्याच्या आरोपांमुळे सुपेकर यांची विशेष पोलीस महानिरिक्षक (कारागृह व सुधार सेवा) पदावरुन गृहरक्षक दलात उप-महासमदेशक तातडीने पदी बदली झाली होती. ‘डीएचएफएल’चे प्रवर्तक असलेल्या वाधवान कुटुंबियांना करोना टाळेबंदीदरम्यान आपत्कालीन पास दिल्याबद्दल आघाडी सरकारच्या काळात अमिताभ गुप्ता वादात सापडले होते. राज्यात सत्तापालट होताच गुप्ता यांची महायुती सरकारने कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक पदी बदली केली. गुप्ता हे सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असून ‘इंडो तिबेट सीमा’चे पोलीस महानिरीक्षक आहेत.
४८८ कोटी खरेदीत निर्दोषत्व :
जालिंदर सुपेकर हे पुण्यात येरवडा येथे कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक असताना कैद्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तू खरेदीमध्ये तब्बल 488 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. मात्र ही खरेदी निविदा मागवून नियमाप्रमाणे झाली आहे , असे गृह विभागांने स्पष्ट करत सुपेकर यांना यापूर्वीच निर्दोषत्व दिलेले आहे.
