Suhas Diwase on Puja Khedkar : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने काल (दि. ३० जुलै) रद्द केली. आता त्या यापुढे यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षेसाठी बसू शकणार नाहीत. तसेच त्यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई सुरू आहे. न्यायालयात आपली बाजू वकिलांमार्फत मांडत असताना पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. याआधी त्यांनी वाशिम येथे पोस्टिंग झाली असताना सुहास दिवसे यांच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. मी लैंगिक छळाची तक्रार केल्यामुळेच माझ्याविरोधात कारवाई होत आहे, असाही आरोप खेडकर यांनी केला आहे. दुसऱ्या बाजुला जिल्हाधिकारी सुहास दिवसें यांनी मात्र हे आरोप निरर्थक असल्याचे सांगून नंतर सुचलेले शहाणपण आहे, असे म्हटले आहे. सुहास दिवसे यांनी बुधवारी (३१ जुलै) द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना पूजा खेडकर यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयत ३ जून ते १४ जून या कालावधीसाठीच आल्या होत्या. या कालावधीत मी केवळ तीन वेळाच त्यांना भेटलो, तेही माझे इतर अधिकारी आणि वकीलही समोर असताना. १४ जून नंतर त्यांची रवानगी विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. हे वाचा >> Pooja Khedkar UPSC News: पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द; UPSC चा मोठा निर्णय, भविष्यात यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षेस बसण्यास बंदी! सुहास दिवसे पुढे म्हणाले, "पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात असताना त्यांनी छळाची कोणतीही तक्रार केली नाही. मी राज्य सरकारकडे त्यांची तक्रार केल्यानंतर त्याच्या उत्तरादाखल त्यांनीही सरकारला पत्र लिहिले होते, त्या पत्रातही त्यांनी छळाचा कोणताही उल्लेख केलेला नाही. पण जेव्हा त्यांची वाशिमला बदली झाली, तेव्हाच त्यांना लैंगिक छळाचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी तिथून छळाची तक्रार दाखल केली. मला वाटतं हे त्यांना नंतर सुचलेले आहे." प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात काम करत असताना पूजा खेडकर यांनी भलताच रुबाब दाखविला. खासगी वाहनावर अंबर दिवा लावणे, शिपाई आणि कर्मचारी वर्ग मागणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दालन हडपणे यासारख्या बाबींमुळे दिवसे यांनी राज्य सरकारला पत्र लिहून त्यांची तक्रार केली होती. दिवसे यांच्या तक्रारी नतंर पूजा खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली होती. वाशिमला गेल्यानंतर पूजा खेडकर यांनी दिवसे यांच्यावर लैंगिक छळाची तक्रार दाखल केली. हे ही वाचा >> Pooja Khedkar Bail Plea: “…म्हणून मला लक्ष्य केलं जात आहे”, पूजा खेडकर यांचा न्यायालयात आक्रमक युक्तिवाद; मांडले ‘हे’ मुद्दे! मला त्यांनी रुममध्ये बोलावलं… यूपीएससीने गुन्हा दाखल केल्यानंतर पूजा खेडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. बुधवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात पूजा खेडकर यांचे वकील माधवन यांनी त्यांची बाजू मांडली. न्यायालयात पूजा खेडकर यांची बाजू मांडत असताना वकील माधवन यांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले, सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांना रूममध्ये बोलावलं होतं. मात्र पूजा यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सरकारी यंत्रणांनी माझ्याविरोधात इतकी तत्परता का दाखवली? मला माझ्या बचावाची संधी मिळाली पाहीजे, असा युक्तिवाद पूजा खेडकर यांच्या वतीने वकिलांनी केला.