शिरुर तालुक्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या आईची सोन्याची साखळी हरवली आणि त्याने तिचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. या शेतकऱ्याने आईसाठी मोहनमाळ तयार करुन घेतली होती. आईची मोहनमाळ पाच तोळ्यांहून अधिक वजनाची होती, या मोहनमाळेचं वजन साधारण ५५ ग्रॅम इतकं होतं. ही साखळी हरवल्याने तो तिचा शोध घेत होता. पण आपला हा शोध Free Fire नावाच्या ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून चालणाऱ्या खंडणी रॅकेटचा पर्दाफाश करेल असं त्याला मुळीच वाटलं नव्हतं.
नेमकं काय प्रकरण?
Free Fire हा अनेक प्लेअर्सनी खेळायचा खेळ आहे. यातलं युद्ध हेदेखील आभासी असतं. बॅटल रॉयल या फॉरमॅटमध्ये डझनभर खेळाडूंना या गेमच्या नकाशावर उतरवून खेळवलं जातं एक खेळाडू किंवा एक संघ राहिपर्यंत हा खेळ खेळायचा असतो, म्हणजेच आभासी युद्ध करायचं असतं. मागच्या वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात हे घडलं आमि अखेर महाराष्ट्रातल्या परभणीमधून दोघांना अटक झाली. ४० वर्षीय शेतकरी त्याच्या आई वडिलांसह आणि पत्नी तसंच १४ वर्षीय मुलासह वास्तव्यास होता. मुलगा अभ्यासासाठी फोन घेतो असं पालकांना वाटत होतं. पण समोर आलेल्या घटनांमुळे वेगळंच प्रकरण उघडकीस आलं. शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार त्याच्या आईकडे साडेपाच तोळे वजनाची मोहनमाळ होती. कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये किंवा समारंभात त्याची हा दागिना परिधान करत असे. इतर वेळी तो कुलुपबंद कपाटात असे. काही पिढ्यांचा वारसा म्हणून हा दागिना ती वापरत होती.
२६ सप्टेंबर २०२५ रोजी काय घडलं?
२६ सप्टेंबर २०२५ च्या सकाळी कपटात मोहनमाळ शोधली पण ती सापडली नाही. त्यानंतर त्यांनी कुटुंबातल्या इतर सदस्यांना याबाबत विचारणा केली. पण मोहनमाळ सापडली नाही. ज्यानंतर मोहनमाळ चोरीला गेली अशी तक्रार नोंदवली गेली. मात्र ५ ऑक्टोबरला एक वेगळीच घटना घडली. तक्रारदार शेतकऱ्याच्या पत्नीने मुलाची पँट धुण्यासाठी घेतली तेव्हा त्या पँटच्या खिशात तिला मोहनमाळेचा एक छोटासा तुकडा आढळला. त्यानंतर या मुलाची चौकशी केली असता घरातल्या मोबाइलवर तो फ्री फायर खेळ होता. हा खेळ खेळताना परभणीच्या मयुर भिसाडची त्याची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. ही व्यक्ती गेमिंग आयडी उपलब्ध करुन देण्याचा दावा करत होती असं पोलिसांनी सांगितलं.
मयुर भिसाडने १४ वर्षांच्या मुलाला काय सांगितलं?
मयुर भिसाडने आपल्याकडे गेमिंग आयडीसाठी १५ हजार रुपये मागितले असं या १४ वर्षीय मुलाने सांगितलं. १४ वर्षांच्या मुलाकडे पैसे नव्हते. त्यामुळे या मुलाने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर दोन दिवसांनी मयुर भिसाडने या मुलाला सांगितलं की तुझ्या आईच्या फोनमध्ये पैसे असतील ते मला ट्रान्सफर कर. ज्यानंतर या मुलाने मयुर भिसाडला आईच्या मोबाइलवरुन एक हजार रुपये पाठवले. यानंतर भिसाडने काही दिवसांसाठी त्याचा आयडी ब्लॉक केला होता. यानंतर या मुलाने मयुर भिसाडशी इन्स्टाग्रामवर संपर्क केला. त्यावेळी मयुर भिसाडने एक लाख रुपये मागितले. मयुरला या मुलाने सांगितलं की इतके पैसे मी कुठून आणू? त्यावर मयुर त्याला म्हणाला मला सोनंही चालेल. तू तुझ्या घरात चोरी कर आणि मला सोनं पाठव. या दरम्यान या मुलाने मयुर भिसाडला आजीच्या मोहनमाळेचा फोटो पाठवला. त्यानंतर मयुरने या मुलाला सांगितलं की ही मोहनमाळ मला दिलीस तर तुझा गेमिंग आयडी तुला नक्की मिळेल. मोहनमाळ चोरी झाल्यानंतर एक ते दीड महिन्याने हा प्रकार उघडकीस आला. भिसाड ही माळ घेण्यासाठी कोरेगाव भीमाला आला होता. या मुलाने आजीची मोहनमाळ चोरली पण त्याचं पेंडंट घरात ठेवलं. ही मोहनमाळ तोडून त्यातला काही भागमयुर भिसाडला दिला. ज्यावर मयुर या मुलावर चिडला. मला सगळीच्या सगळी मोहनमाळ हवी आहे ती दिली नाहीस तर तुला ठार मारेन अशी धमकी त्याने या मुलाला दिली, एवढंच नाही या मुलाकडून मोहनमाळेचे सगळे तुकडे हिसकावून घेतले. त्यानंतर या मुलाला त्याने आयडी दिला. पण तो काही दिवसांमध्येच डिअॅक्टिव्हेट झाला. त्यानंतर या मुलाकडे मयुर भिसाडने ते पेंडंटही मला हवं आहे असं सांगितलं. तसंच तू मला ते दिलं नाहीस तर तुला ठार करेन अशी धमकीही दिली.
१४ वर्षांच्यामुलाने काय काय सांगितलं?
१४ वर्षांच्या मुलाने काय घडलं कसं घडलं ते सगळं घरातल्यांसमोर कबुल केलं. त्यानंतर कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली. यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी शशिकांत भिसाड यांचा मुलगा मयुर भिसाड आणि किशोर डहाळे अशा दोघांना परभणीतून अटक केली. पोलिसांनी खंडणी म्हणून उकळलेली ती मोहनमाळ म्हणजेच तिचे तुकडेही या दोघांकडून जप्त केले. पुणे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी सांगितलं की मोबाइल फोन हा सध्या मुलांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. मात्र त्याचा उपयोग शिक्षणासाठी आणि संपर्क ठेवण्यासाठी केला पाहिजे. त्याऐवजी मुलं ऑनलाइन गेम खेळतात आणि अशा प्रकारे खंडणीच्या जाळ्यात अडकतात. मुलांना या प्रकारचे धोके पालकांनी समजावून सांगितले पाहिजेत असंही ते म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
