नाशिकमध्ये गाजत असलेलं अशोक खरात आणि त्याच्या बाबागिरीचं प्रकरण, त्याने महिलांचं केलेलं शोषण हे सगळं चर्चेत आहे. अशोक खरातला अटक झाली आहे, त्याला शिक्षाही सुनावली जाईल. पण पुण्यातलं एक असं प्रकरण आहे ज्या प्रकरणात स्वयंघोषित बाबाला आणि शंकर महाराज अंगात येतात असं सांगणाऱ्या त्याच्या पत्नीला जामीन मंजूर झाला आहे. १४ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप या दोघांवर आहे. आपण जाणून घेऊ हे प्रकरण नेमकं काय आहे?

वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांचं प्रकरण काय?

वेदिका पंढरपूरकर आणि तिचा नवरा कुणाल पंढरपूरकर यांना दीपक डोळस यांची १४ कोटींना फसवणूक केल्या प्रकरणी ७ नोव्हेंबर २०२५ ला अटक करण्यात आली होती. दोघंही पुण्यातल्या कोथरुडमधले रहिवासी आहेत. दोघांनीही शंकर महाराज आपल्या अंगात येतात असा बनाव रचला होता. दीपक पांडुरंगराव डोळस यांनी १४ कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार ३ नोव्हेंबर २०२५ ला नोंदवली होती. या दोघांच्या अटकेनंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.

नोव्हेंबर २०२५ मध्ये घटना उघड

महिला मांत्रिक वेदिका पंढरपूरकर आणि तिचा नवरा कुणाल पंढरपुरकर यांनी पुण्यातील डोळस कुटुंबाची १४ कोटींना फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नोव्हेंबर महिन्यात उघडकीस आला होता. कोथरुड येथे या दोघांनी कैलासदीप नावाचा आलिशान बंगला खरेदी केला होता. पुण्यातील डोळस आडनाव असलेल्या उच्चशिक्षित जोडप्याकडून वेदिका पंढरपूर यांनी उपचारांच्या नावाखाली १४ कोटी रुपये उकळले. यासाठी या जोडप्याने इंग्लंडमध्ये असलेले आपले घर आणि फार्महाऊसही विकले होते. आता या दाम्पत्याकडे आपल्या मुलींवर उपचार करण्यासाठीही पैसे उरले नाहीत.

'Godwoman' Vedika Pandharpurkar's bungalow in Kothrud. (Photo Credit: Special Arrangement)
वेदिका पंढरपूरकरचा कोथरुडचा बंगला (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

डोळस कुटुंबाला गंडा कसा घालण्यात आला?

दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नीची कोथरुडमधील मांत्रिक वेदिका पंढरपूरकर आणि तिचा नवरा कुणाल यांनी फसवणूक केली. दीपक काही वर्ष इंग्लंडमध्ये नोकरी करत होते. त्यांच्या दोन मुली या नेहमी आजारी असायच्या. त्यामुळे दीपक डोळस चिंतेत असायचे. दरम्यानच्या काळात त्यांची ओळख राजेंद्र उर्फ दीपक खडके आणि त्याची शिष्या वेदिका पंढरपूरकर हिच्याशी झाली. या दोघांनी ‘शंकर महाराज’ त्यांच्या अंगात येतात आणि ते दुर्धर आजार बरे करतात असा दावा केला. विश्वास बसावा म्हणून वेदिका पंढरपुरकरने स्वतःच्या अंगात ‘शंकर महाराज’ आले आहेत असा खोटा आव आणला. त्यानंतर त्यांनी डोळस कुटुंबाला सांगितले की, तुमचे धन आम्ही जपून ठेवल्यास आणि पूजा केल्यास तुमच्या दोन्ही मुली बऱ्या होतील. याच बहाण्याने या भोंदू जोडीने डोळस दाम्पत्याकडून बँकेतील सर्व ठेवी आणि बचत निधी त्यांच्या खात्यात ऑनलाइन वळवून घेतला. या भोंदू जोडीचा कारनामा एवढ्यावरच थांबला नाही तरी त्यांनी डोळस यांचे इंग्लंडमधील घर आणि फार्महाऊस विकून त्याचे पैसेही वेदिका पंढरपुरकरच्या खात्यात वळवून घेतले.

पंढरपूरकर कुटुंबाचा दरबार कसा भरायचा?

दीपक डोळस यांनी आणि त्यांची पत्नी अंजली यांनी जी तक्रार केली त्यात त्यात त्यांनी म्हटलं आहे की अंजली यांनी भजनी मंडळात भाग घेणं सुरु केलं होतं. त्यात भक्तिगीत गाण्याची स्पर्धा होती. तिथे तिची भेट खडकेशी झाली. मी अवतार आहे असं त्याने सांगितलं नंतर त्यानेच माझ्या पत्नीची ओळख वेदिका पंढरपूरकरशी करुन दिली. तिने शंकर महाराज अंगात आल्याचा दावाही केला होता. वेदिका त्या काळात तिच्या घरी दरबार भरवत होती. तिथे भक्त अनेक समस्या घेऊन येत असत. या दरबारात खडके हा डोळस कुटुंबाला घेऊन गेला होता. अशी माहिती पोलिसांनी दिली. तसंच पोलिसांनी हे देखील सांगितलं की वेदिका पंढरपूरकरने दीपक डोळसबाबत सगळी माहिती काढली होती. त्याची मालमत्ता किती आहे, त्याचं शिक्षण किती झालं आहे? त्याच्या मुलींना काय आजार आहे सगळं वेदिकाला ठाऊक होतं.

डिसेंबर २०२५ मध्ये कोर्टात काय घडलं?

डिसेंबर २०२५ मध्ये कोर्टाला वेदिकाच्या वकिलांनी हे सांगितलं की जर त्यांना तात्पुरता जामीन दिला गेला तर वेदिका आणि तिचा नवरा दोघंही डोळस कुटुंबाचे १४ कोटी रुपये परत करतील. त्यानंतर २० मार्च २०२६ ला अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर.चौधरी यांनी या प्रकरणात तीन आरोपींना तात्पुरता जामीन मंजूर केला. तसंच कैलासदीप बंगला आणि सान्वी मसाले फॅक्टरी या पंढरपूरकर कुटुंबाच्या मालमत्तांना सील करण्यात यावं असेही आदेश देण्यात आले. तसंच या दोन्ही मालमत्ता विका आणि डोळस कुटुंबाचे पैसे परत करा असंही सांगण्यात आलं. दीपक डोळस यांचे वकील विजयसिंह ठोबरे यांनी सांगितलं की कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मालमत्ता ६० दिवसांत विकली गेली नाही तर ती पुन्हा सील करण्यात येईल. कोर्टाने पाच बँकांना आणि इन्शुरन्स कंपनीला हे आदेश दिले आहेत की डोळस यांना ५७ लाख ५९ हजार रुपये परत करावेत.