मुंबई: पुण्यातील रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागातील रुग्णशय्याची संख्या पुरेशी आहे. पुणे शहराची सध्या लोकसंख्या ४५ लाख आहे. भविष्यात वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन पुण्यासाठी आरोग्य सेवेचा एक सर्वकष आराखडा तयार केला जात असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली.
पुणे शहरात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अतिदक्षता विभागातील रुग्णशय्यांची संख्या कमी आहे. रुग्णांना उपचारासाठी अनेक तास प्रतिक्षा करावी लागत आहे. खासगी व शासकीय रुग्णालयात गंभीर आजार असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने आरोग्य सेवेवर अतिरिक्त ताण येत आहे. रुग्ण जास्त आणि रुग्णशय्या कमी अशा विपरीत स्थितीमुळे नागरीकांमध्ये अस्वस्थता व असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. नागरीकांना दर्जेदार आरोग्य सुविद्या देण्यात यावी, अशी लक्षवेधी सुनील कांबळे यांनी मांडली.
त्यावर भीमराव तापकीर, दिलीप लांडे, योगेश सागर, हेमंत रासने, शंकर जगताप, अमित देशमुख, अभिजित पाटील या सदस्यांनी उपप्रश्न विचारले. लातूर मधील अनेक रहिवाशी पुण्यात उपचारासाठी येत आहेत. लातूर मध्ये नवीन रुग्णालय उभारण्यात यावे अशी मागणी अमित देशमुख यांनी केली.
पुण्यात आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्ण उपचासाठी येत असल्याने पुण्यातील रुग्णालयांतील दर्जेदार सुविद्यांसाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहे. औंध येथे सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल सुरु केले जाणार आहे. पुण्यातील एकत्रित आरोग्य सेवेसाठी एक आराखडा तयार करण्याचे काम सुरु असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.
