Ketan Agarwal Lohagad Fort Pune Murder Case Investigation Details: पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल (वय २६) याच्या लोहगड किल्ल्यावरील संशयास्पद मृत्यूचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. सुरुवातीला ‘ट्रेकिंग’ दरम्यान झालेला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे एक भयंकर आणि क्रूर कट असल्याचे तपासात उघड झाले आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून हा पूर्वनियोजित खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

थाटामाटात सुरू होती लग्नाची तयारी, उदयपूर येथे शाही विवाहसोहळ्याचे भव्य नियोजन!

गहुंजे (पुणे) येथील रहिवासी असलेले केतन अग्रवाल हे त्यांच्या कौतुंबिक रिअल इस्टेट कंपनीत संचालक म्हणून कार्यरत होते. घरच्यांनी त्यांच्यासाठी २० वर्षीय सिया गोयल हिचे स्थळ शोधले होते. सियाचे कुटुंब ड्रायफ्रूट्सच्या व्यवसायात असून, ती कॉमर्सची विद्यार्थिनी होती आणि स्वतःचा बेकरी व्यवसाय सुरू करण्याच्या प्रयत्नात होती.

दोन्ही कुटुंबांच्या संमतीने चालू वर्षाच्या अखेरीस त्यांचा विवाह निश्चित झाला होता. राजस्थानमधील उदयपूर येथे या शाही विवाहसोहळ्याचे भव्य नियोजन करण्यात आले होते आणि त्यासाठीची पूर्वतयारीही पूर्ण झाली होती. मात्र, या आनंदाच्या वातावरणात केतन एका धोकादायक ‘लव्ह ट्रँगल’चा (प्रेम त्रिकोण) बळी ठरेल, याची कोणालाही पुसटशी कल्पना नव्हती.

दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची गडबड सुरू असताना, सियाचे मात्र तिच्याच ओळखीतील २२ वर्षीय चेतन चौधरी याच्यावर प्रेम होते.

लग्न मोडण्यासाठी सियानेच प्रियकरासोबत रचला कट

दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाची गडबड सुरू असताना, सियाचे मात्र तिच्याच ओळखीतील २२ वर्षीय चेतन चौधरी याच्यावर प्रेम होते. चेतनचे कुटुंबही ड्रायफ्रूट्सच्याच व्यवसायात आहे.

“सियाचे केतनशी लग्न ठरले होते, मात्र तिची या लग्नाला अजिबात इच्छा नव्हती. तिला चेतनसोबतच राहायचे होते. यातूनच सिया आणि चेतनने मिळून केतनला वाटेतून हटवण्याचा अत्यंत भयानक कट रचला,” अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सियाने केतनला ट्रेकिंगच्या बहाण्याने लोहगडावर आणण्याचा प्लॅन केला.

लोहगडावर नेमकं काय घडलं?

नियोजित कटानुसार, १८ जून रोजी सिया केतनला घेऊन लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेली. तिचा प्रियकर चेतन चौधरी आधीच तिथे दबा धरून बसला होता. सिया आणि केतन किल्ल्यावर चढत असताना चेतन त्यांच्या मागे-मागे गेला. एका निर्जन आणि खोल दरी असलेल्या ठिकाणी पोहोचताच, सिया आणि चेतनने मिळून केतनला थेट ४०० फूट खोल दरीत ढकलून दिले.

यानंतर सियाने स्वतः पोलिसांना फोन करून, “केतनचा फोटो काढताना पाय घसरला आणि तो दरीत पडला,” असा बनाव रचला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र, केतनच्या कुटुंबीयांना संशय आल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सखोल चौकशी केली, ज्यामध्ये या संपूर्ण हत्येचा पर्दाफाश झाला.

…आणि ‘बाली’चा प्री-वेडिंग शूट रद्द झाला!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनला मारण्यासाठी सियाने आधीही अनेक प्रयत्न केले होते. चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केतन आणि सिया प्री-वेडिंग फोटोशूटासाठी ‘बाली’ (इंडोनेशिया) येथे जाणार होते. ते मुंबई विमानतळावर पोहोचले, मात्र तिथे अचानक केतनचा पासपोर्ट गहाळ झाला. त्यामुळे त्यांना ट्रिप रद्द करून परत यावे लागे. तपासात समोर आले आहे की, बालीला जाणे टाळण्यासाठी सियानेच केतनचा पासपोर्ट लपवून ठेवला होता.

दोनवेळा प्रयत्न हुकला, तिसऱ्यांदा घात केला

पासपोर्टची युक्ती यशस्वी झाल्यानंतर सियाने केतनला ट्रेकिंगच्या बहाण्याने लोहगडावर आणण्याचा प्लॅन केला. १८ जूनच्या आधी तिने केतनला दोन वेळा लोहगडावर आणले होते. मात्र, त्या दोन्ही वेळेस गर्दीमुळे किंवा योग्य संधी न मिळाल्यामुळे त्यांना कट पूर्ण करता आला नाही. अखेर १८ जून रोजी तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी केतनला दरीत ढकलून आपला क्रूर डाव साधलाच.

पुणे ग्रामीण पोलिसांनी काय माहिती दिली?

पुणे ग्रामीण पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींना भारतीय न्याय संहितेच्या (BNS) हत्या आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या कलमांखाली अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी त्याच्या अकस्मात मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. त्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस, तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले. अगररवाल कुटुंबीयांनी फिर्यादीत संशय व्यक्त केल्यानंतर सियाला ताब्यात घेऊन तिची चौकशी करण्यात आली. चौकशीत तिने प्रियकर चेतन याच्याशी संगनमत करुन नियोजित पती केतन याला लोहगडावरुन ढकलून देऊन खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.

पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय अधिकारी गजानन टोण्पे, उपअधीक्षक राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहायक निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक अभिजित सावंत, संतोष शेळके, तुषार भोईटे, गणेश होळकर, संजय पड्याळ, अजित भुजबळ, अमोल शेडगे, भारत मोहोळ, चेतन पाटील, गणेश धनवे, नंदा कदम, सुजाता कदम, शरयू बिरंबुळे, जय पवार, सागर धनवे यांनी ही कामगिरी केली.