अलिबाग – गणेशोत्सवासाठी पुण्याकडून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना माणगाव बायपासमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या बायपासचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झाले असून, पूर्ण झालेला भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे ताम्हिणी घाटमार्गे कोकणाकडे येणारी वाहतूक माणगाव शहरात न आणता थेट पुढे वळवणे शक्य झाले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि परिसरातून मोठ्या संख्येने वाहने कोकणाच्या दिशेने रवाना झाली आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर तसेच माणगाव शहरात वाहतुकीचा मोठा ताण निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र बायपासचा पूर्ण झालेला भाग वाहतुकीसाठी उपलब्ध झाल्याने अनेक वाहनांना शहरात प्रवेश न करताच पुढील मार्ग गाठता येत आहे.

माणगाव शहरातून जाणाऱ्या वाहतुकीचे प्रमाण कमी झाल्याने शहरातील मुख्य मार्गांवरील कोंडीचा ताणही काही प्रमाणात कमी झाला आहे. विशेषतः गणेशमूर्ती आणि साहित्य घेऊन गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा फायदा होत आहे. पूर्वी माणगाव शहरातून मार्गक्रमण करताना वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता असायची. आता बायपासमुळे हा वेळ वाचत असून प्रवास अधिक सुकर झाला आहे.

माणगाव बायपासचे काम अनेक वर्षांपासून रखडल्याने गणेशोत्सव, उन्हाळी सुट्टी आणि अन्य गर्दीच्या काळात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत होता. पुण्याकडून ताम्हिणी घाटमार्गे येणारी वाहने माणगाव शहरातून पुढे जात असल्याने शहरातील वाहतुकीवर मोठा ताण येत होता. बायपासचा काही भाग कार्यान्वित झाल्याने या समस्येवर तात्पुरता का होईना, पण दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, बायपासचे उर्वरित कामही वेगाने पूर्ण झाल्यास भविष्यात माणगाव शहरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.