Lohagad murder case latest updates : पुण्यातील लोहगड किल्ल्याच्या दरीत एका तरुण व्यावसायिकाचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासाअंती एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरुणाच्या होणाऱ्या पत्नीनेच त्याची सुनियोजित हत्या केल्याचं उघड झालं आहे. दरम्यान, या जोडप्याचे काही जुने व्हिडिओ आता समोर आले असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
केतन विशाल अगरवाल (वय २५, रा. लोढा बेलमाँटो टॉवर, गहुंजे, ता. मावळ, जि. पुणे) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सिया प्रवीण गोयल (वय २०, रा. लिलाकुंज, गंगाधाम-बिबवेवाडी रस्ता, बिबवेवाडी) आणि चेतन बाबुलाल चौधरी (वय २२, रा. पार्श्वनाथनगर, कोंढवा बुद्रुक) यांना अटक केली आहे.
अपघात नव्हे सुनियोजित कट
१८ जून रोजी लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेले असताना फोटो काढताना पाय घसरून केतन दरीत कोसळला, असा प्राथमिक दावा सियाने केला होता. मात्र, पोलिसांना या घटनेबाबत संशय आल्याने त्यांनी तपासाची चक्रे फिरवून खोलात चौकशी सुरू केली. तेव्हा हा अपघात नसून एक सुनियोजित हत्या असल्याचा प्रकार उघडकीस आला. सियाला केतनबरोबर लग्न करायचे नव्हते; त्यामुळे तिने तिचा प्रियकर चेतनच्या मदतीने केतनचा काटा काढल्याचे तपासात निष्पन्न झाले.
महिनाभरापूर्वीच सुरू होती वाढदिवसाची तयारी
केतन आणि सियाचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. या साखरपुड्याचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. विशेष म्हणजे, १९ जून रोजी सियाचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी केतनने एक खास प्लॅन आखला होता. मात्र, वाढदिवसापूर्वीच सियाने केतनची हत्या केली. आता या दोघांचे काही रोमँटिक व्हिडिओ समोर आले असून, त्यामध्ये केतनने कशा पद्धतीने सियाला सरप्राईज दिलं होतं आणि दोघांमध्ये कसं नातं होतं, हे स्पष्टपणे दिसत आहे.
‘त्या’ व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संताप
एका व्हिडिओमध्ये केतन तिला चारचाकी गाडीत फुलांचा पुष्पगुच्छ देताना दिसतोय. एवढंच नव्हे तर त्याने संपूर्ण गाडी फुलांनी सजवली होती आणि सनरुफवरही फुलांची सुंदर आरास केली होती. तो तिच्या हातात फूल देतो आणि गाडीचे सनरुफ उघडतो, ज्यावर केलेली फुलांची सजावट दिसते. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘पसंद है तुम्हे मालूम है, तुमने बताया था…’ हे गाणं वाजत आहे.
तर, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये हे जोडपं एका हॉटेलमध्ये सेलिब्रेशन करताना दिसत असून ‘आँखो मे तेरी अजब सी अजब सी अदाए है’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. १९ जून रोजी सियाचा वाढदिवस होता, पण केतनने महिनाभर आधीच म्हणजेच १९ मेपासूनच तिच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू केली होती. सध्या व्हायरल झालेले हे व्हिडिओ १९ मेचेच असल्याचं समोर येतंय.
नेटिझन्सच्या संतप्त प्रतिक्रिया
या व्हिडिओंवर नेटिझन्सने अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. “केतन उच्चशिक्षित, श्रीमंत, देखणा आणि मुख्य म्हणजे सियावर जिवापाड प्रेम करणारा होता; तरीही तिने असा टोकाचा निर्णय का घेतला?” असा सवाल करत नेटीझन्स सियावर तीव्र टीका करत आहेत. “केतनचं सियावर किती प्रेम आहे हे त्याच्या डोळ्यांत पाहूनच कळतंय”, असं काहींनी म्हटलंय तर. तर काहींनी कमेंट्समध्ये “तिच्या डोळ्यांत केतनबद्दल अजिबात प्रेम दिसत नाहीये,” असंही म्हटलं आहे.
