Pune Mayor Residence Controversy : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषाशुद्धीच्या चळवळीतून अनेक सुंदर शब्द मराठीला दिले, त्यांपैकी एक ‘महापौर!’ हा शब्द प्रचलित होण्यास पुणे शहर कारणीभूत ठरले. तत्कालीन पुणे नगरपालिकेची महापालिका झाल्यानंतर १९५३-५४ या वर्षी पुण्याचे दुसरे महापौर म्हणून गणपतराव नलावडे यांची निवड झाली. तोपर्यंत महापौरांसाठी ‘मेयर’ शब्द वापरला जात होता. नलावडे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनुयायी होते. सावरकरांनी नलावडे यांना अभिनंदनपर पत्र पाठविले. त्या पत्रात त्यांनी ‘मेयर’ या शब्दाला ‘महापौर’ हा मराठी शब्द सुचविला. नलावडे यांनी लगेच त्यांच्या कार्यालयाबाहेर ‘महापौर’ असा फलक लावला आणि हा शब्द रुळला.

‘महापौर’ शब्दाची ही महती असताना आता पुण्यात ‘महापौर निवास’चे नामकरण ‘रामदूत’ करण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेत आल्याने राजकीय वर्तुळात वादाची ठिणगी पडली. माजी महापौरांच्या संघटनेने या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. हे दोन्ही शब्द भाजपचा स्वाभिमान आणि अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपपुढे ‘महापौर निवास’ की ‘रामदूत’ असा यक्षप्रश्न पडला आहे.

नेमका वाद कशामुळे?

पुण्यात घोले रस्त्यावर महापौर बंगला आहे. हा बंगला ‘महापौर निवास’ म्हणून पुणेकर ओळखतात. शहराचे प्रथम नागरिक असल्याने महापौर हे सन्मानाचे आणि शहराच्या प्रतिष्ठेचे पद आहे. त्यामुळे या वास्तूला पुणेकरांच्या दृष्टीने आदराचे स्थान आहे. त्याचे नाव बदलून ‘रामदूत’ ठेवण्याचा प्रस्ताव भाजपच्याच स्वीकृत नगरसेवकाने दिला आहे. त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. माजी महापौरांच्या संघटनेनेच या प्रस्तावाला विरोध केला आहे. ‘महापौर निवास’ हे नाव बदलू नये, अशी मागणी पुणे शहर माजी महापौर संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. माजी महापौर संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी भोसले, सचिव कमल व्यवहारे, निमंत्रक अंकुश काकडे यांनी हे निवेदन महापौर मंजूषा नागपुरे यांना दिले. महापौरपदाची प्रतिष्ठा आणि वास्तूची ओळख वर्षानुवर्षे ‘महापौर निवास’ हीच आहे. ती कायम ठेवावी, असे संघटनेचे म्हणणे आहे.

‘महापौर निवास’चा इतिहास

महापौरांसाठी शहरात निवास असावा, या हेतूने ‘महापौर निवास’ बांधण्याची संकल्पना मांडण्यात आली. त्यासाठी महात्मा फुले यांचे सहकारी आणि सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉ. विश्राम रामजी घोले यांचे नाव दिलेल्या रस्त्यावरील जागा निश्चित करण्यात आली. त्यानंतर या रस्त्यावर दुमजली बंगला बांधण्यात आला. या वास्तूचे उद्घाटन २००२ मध्ये तत्कालीन महापौर दीप्ती चवधरी यांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हापासून या वास्तूला ‘महापौर निवास’ या नावाने ओळखले जाते.

सत्ताधारी भाजपच्या एका स्वीकृत नगरसेवकासह अन्य एका नगरसेवकाने या बंगल्याचे नाव ‘रामदूत’ असे करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला विरोध असल्याची भूमिका माजी महापौर अंकुश काकडे यांनी स्पष्ट केली आहे. मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये महापौरांसाठी असलेल्या निवासस्थानांना ‘महापौर निवास’ हे नाव प्रचलित आहे. ‘महापौर निवास’ ही केवळ वास्तू नाही, तर ती महापौरपदाशी जोडलेली अधिकृत ओळख आहे. नाव बदलल्यास या वास्तूच्या प्रचलित ओळखीवर परिणाम होईल. त्यामुळे हा ठराव मागे घ्यावा, असे काकडे यांचे म्हणणे आहे. महापौर हे पद कोणत्याही एका विचारसरणीचे नसून, ते शहराच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. महापौर हे पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन शहराचे प्रतिनिधित्व करत असतात. त्यामुळे निवासाचे मूळ नाव बदलून विशिष्ट संदर्भाचे नाव देणे, हे कितपत स्वीकारार्ह आहे, असा सवाल माजी महापौरांच्या भूमिकेतून स्पष्ट होतो. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘महापौर’ शब्द सुचविण्यामागे व्यापक दृष्टी होती. महापौर हा त्या शहरातील रहिवाशांचा पालक असतो. सावरकरांचे नाव आदराने घेणाऱ्या विचारसरणीने त्यांनीच दिलेल्या ‘महापौर’ या शब्दाची ओळख पुसायची का, अशा धर्मसंकटात सत्ताधारी भाजप पडला आहे.

‘रामदूत’ नाव आणि भाजपची द्विधा मनःस्थिती

आता हा प्रस्ताव देण्यामागील उद्देश आणि त्यामागील भावनेचाही विचार करावा लागतो. ‘रामदूत’ हे नाव देण्याच्या प्रस्तावामागे सांस्कृतिक मूल्य जपण्याचा प्रयत्न असावा. ‘रामदूत’ म्हणजे सेवा, समर्पण आणि निष्ठेचे प्रतीक मानले जाते. शहराची आणि नागरिकांची सेवा करणाऱ्या शहराच्या प्रथम नागरिकाच्या निवासाला हे नाव दिल्यास सेवेची प्रेरणा मिळेल, असा युक्तिवाद या प्रस्तावामागे असू शकतो. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘महापौर’ हा भाषिकदृष्ट्या सार्वभौम शब्द दिला असताना ही ओळख बाजूला करायची कशी, अशा द्विधा मनःस्थितीत सत्ताधारी भाजप आहे.

पुण्यात वाहतूककोंडी, रस्त्यावरील खड्डे असे प्रश्न आ वासून उभे आहेत. महापौर निवास असो किंवा शहराची कोणतीही वास्तू असो, तिचे नाव बदलताना शहराच्या सांस्कृतिक प्रगल्भतेचा विचार व्हायला हवा. नामांतराने आत्मिक समाधान मिळेल; पण त्या पदावर विराजमान होणाऱ्या व्यक्तीने पुण्याच्या समस्या सोडविण्याकडे लक्ष द्यावे, ही पुणेकरांची अपेक्षा आहे. मग नाव काही का असेना!