पुण्यातील शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रोचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. पुण्यातल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन उपस्थित होते. त्यांनी या मेट्रोचं लोकार्पण केल्यानंतर भाषण केलं आणि विकासाचा अजेंडा सांगितला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
दिवाळी अगदी जवळ आली आहे, सर्वात आधी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सण-उत्सवांचा आनंद द्विगुणित होतो जेव्हा आयुष्यात नवी सुविधा जोडली जाते. आज पुणेकरांसाठी अशीच संधी आहे. आज पुणे मेट्रोसाठी एका नव्या लाईनचं लोकार्पण होतं आहे. दहा वर्षांपू्र्वी मी पहिल्या कामाचं लोकार्पण केलं होतं. आता तिसरी लाईन सुरु होते आहे, यामुळे आयटी हबला मोठी मदत मिळणार आहे. जुने आणि नवे भाग मेटो जोडते आहे. मी पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांचं यासाठी अभिनंद करतो. पुणे शहराने कायमच देशाला आणि राज्याला नवी दिशा दिली आहे. कल्पकतेपासून उत्पादनापर्यंतच्या अनेक गोष्टी पुण्यात होतात. मेट्रोचं जाळं या ठिकाणी विणलं जातं आहे त्यामुळे पुण्याला आणखी गती आगामी काळात मिळणार आहे.
विकसित भारतासाठी आम्ही कशा प्रकारे तिथे सोयी-सुविधा करतो आहोत ते या शहरावरून कळतं आहे. मेट्रो प्रकल्प कुठल्याही शहराचा दर्जा वाढवतोच. पुणे मेट्रोचा जेवढा विस्तार होतो आहे त्यामुळे वेळही वाचते आहे आणि पुण्यातल्या लोकांना सुविधाही उत्तम मिळते आहे.
आजचा दिवस हे गुड गव्हर्नन्सचंही उदाहरण आहे. आपल्या देशात पहिली मेट्रो १९८४ मध्ये चालली होती. त्यानंतरच्या ३० वर्षांत २४८ किमी मेट्रो झाली. २०१४ पर्यंत देशात ५ शहरांमध्ये मेट्रो चालायची. त्या जुन्या विचारांनी आम्ही चालत नाही. जर जुनं सरकार, जुनी धोरणं असती तर मेट्रो यायला आणखी विलंब झाला असता. २०१४ मध्ये आमच्या हाती जेव्हा देश आला तेव्हा आम्ही संकल्प केला की लोकांचा प्रवास सुखकर व्हावा. मागच्या १२ वर्षांत मेट्रो सेवेचा कायापालट झाला आहे. २०१४ नंतर आतापर्यंतचा मेट्रो मार्ग १२०० किमी झाला आहे. तर २०१४ च्या आधी पाच शहरांमध्ये मेट्रो चालत होती. आता देशातल्या २६ शहरांमध्ये मेट्रो चालणार आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विकासाचं एक उत्तम मॉडेल म्हणजे पुणे मेट्रो आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीला दिशा मिळणार आहे. We Will Do it हा भाव प्रत्येकाच्या मनात आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
