MPSC Protester Vivekanand Patil : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनात अनेक पक्षाचे नेते येऊन भेट देत पाठिंबा दर्शवत आहेत. यामध्ये आंदोलक विवेकानंद पाटील याची जोरदार र्चा आहे. त्याच्या वक्तृत्त्वामुळे या आंदोलनाला धार आली आहे. सरकारवर टीकास्त्र डागत त्याने एमपीएससीचे अध्यक्ष भीमनराव यांच्या राजीनाम्याची मागणीला जोर दिला. दरम्यान, यावेळी विवेकानंद पाटील याच्या घराचेही काही व्हिडिओ समोर आले. त्यामुळे काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी त्याला घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं. मात्र, विवेकानंद पाटील याने ही मदत नाकारली आहे.

माझ्या परिस्थितीचं भांडवल करू नका

नामदेव ढसाळ, विश्वास पाटील यांसहित अनेक लेखकांची प्रसिद्ध पुस्तके तोंडपाठ असलेला; डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या विचारांचं पालन करणारा; राजकीय नेत्यांची खडान् खडा माहिती असलेला विवेकानंद पाटील हा मुळचा कोल्हापुरातील राधानगरी येथील आहे. अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला विवेकानंद सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याची रोखठोक भाषणं आणि आंदोलनस्थळावरील त्याच्या मागण्या सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे. त्यामुळे त्याला आर्थिक मदत करायला येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. यातच, काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनीही त्याला घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं. मात्र, त्याने माझ्या परिस्थितीचं भांडवल करू नका, असं थेट शब्दांत सांगितलं. तो टीव्ही ९ मराठीशी बोलत होता.

लाथ मारेन तिथे पाणी काढेन

विवेकानंद पाटील म्हणाला, “विश्वजीत कदम यांचे मी आभार मानतो. पण मला मदत नको. मी २४ वर्षांचा तरुण आहे. मला परिस्थितीचं भांडवल अजिबात करायचं नाही. मला बाकीचेही मेसेज करून आर्थिक मदत लागत आहे का असं विचारत आहे. सध्या मला कसलीही मदत नकोय. जेव्हा मदत लागेल तेव्हा महाराष्ट्र माझाच आहे, मी हक्काने नक्कीच मदत मागेन. पण सध्या लाथ मारेन तिथे पाणी काढण्याची धमक आहे.”