MBA झालेल्या पायल झांबरे या विवाहित तरूणीचा मृत्यू पुण्यातल्या मुकुंद नगर भागात झाला. तिने सासरच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवल्याचा संशय आहे. कारण पायलच्या माहेरच्यांनी तसा आऱोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतलं आहे. तर तिच्या सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं, हुंड्यासाठी छळ, घरगुती हिंसाचार ही कलमं त्यांच्यावर लावण्यात आली आहेत. नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊ.

पायल झांबरेच्या मृत्यूचं नेमकं प्रकरण काय?

पायलच्या माहेरच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर पायलचा सासरच्या मंडळींकडून आणि पतीकडून मानसिक आणि शारिरीक छळ केला जात होता. प्रत्येक दिवाळीत ५ ते १० तोळे सोनं तुझ्या घरून घेऊन ये, अशी मागणी केली जात होती. पायल यांचे कुटुंब शेतकरी असून दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांनी पुढच्या हंगामापर्यंत वेळ मागितला होता, तरीही त्यांचा छळ सुरूच होता. पायल २०२२ मध्ये पायल गरोदर असताना मुलगाच व्हावा यासाठी तिला मानसिक त्रास देण्यात आला. ३० मार्च २०२३ रोजी पायलला मुलगी झाल्यानंतर सासरच्या लोकांनी हॉस्पिटलमध्ये येऊन वाद घातले आणि पायल किंवा बाळाची जबाबदारी घेण्यास नकार दिला होता, असा आरोप पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. पायलचा मृतदेह पुण्याच्या मुकुंदनगरमधील ‘अक्षय हाइट्स’ सोसायटीतील एका जुन्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. सकाळी ७ च्या सुमारास सासरच्या मंडळींनी माहेरच्या लोकांना फोन करून पायल घरून निघून गेल्याचे सांगितले; परंतु माहेरचे लोक तिथे पोहोचले तेव्हा पायल मृत अवस्थेत आढळली आणि पती अक्षय तसेच त्याचे आई-वडील तिथून पसार झाले होते. स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी मृत पायल यांचे पती अक्षय झांबरे, सासू आणि सासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पती अक्षय झांबरे याला ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

पायल स्वतःला संपवू शकत नाही, कुटुंबीयांचा सासरच्या मंडळींवर आरोप

पायल पवार झांबरे या विवाहितेच्या मृत्यूनंतर आता तिच्या नातेवाईकांनी झांबरे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. पायलने आत्महत्या केली नाही तर तिचा खून झाला असा आरोप त्यांनी केला आहे. पुण्यातील पायल झांबरेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पायलच्या सासरच्या लोकांकडून सोनं आणि पैशांसाठी त्यांचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता, असा आरोप पायलच्या माहेरच्यांनी केला आहे. पायल उच्चशिक्षित आणि अत्यंत शांत स्वभावाच्या होती, ती कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू शकत नाही, असा ठाम दावा कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे ही आत्महत्या नसून घातपात असण्याची दाट शक्यता वर्तवत, या प्रकरणाची ‘हत्या की आत्महत्या’ या दोन्ही बाजूंनी सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.