Pune Municipal Corporation Election Exit Poll: राज्यातील आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात गेल्याने २९ महानगरपालिकांच्या निवडणुका गेल्या ४ वर्षांपासून रखडलेल्या होत्या. पण नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आज राज्यात मुंबई, पुण्यासह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले.
दरम्यान, संध्याकाळी सहा वाजता मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी केलेले एक्झिट पोल समोर येत आहेत. पीआरएबी या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पुण्यात पुन्हा एकदा भाजपा सत्ता स्थापन करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुण्यात ९३ जागांसह भाजपा अव्वल स्थानी राहील, असा अंदाज आहे. भाजपानंतर राष्ट्रवादी (अजित पवार) ४३ जागा, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि काँग्रेस प्रत्येकी ८ जागा, शिवसेना (उद्धव ठाकरे) ७ जागा आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) ६ जागा जिंकेल, असा अंदाज पीआरएबी एक्झिट पोलने व्यक्त केला आहे.
यंदा पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीतीलच घटक पक्ष असलेल्या भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात चुरस पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत भाजपाने तब्बल ४० माजी नगरसेवकांची उमेदवारी कापली होती. यातील काहींनी थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेत निवडणूक लढवली होती.
दरम्यान, प्रचारातही अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने आणि भाजपाच्या विविध नेत्यांनी त्यांना दिलेल्या प्रत्युत्तरामुळे या निवडणुकीची सर्वत्र चर्चा होती. आता या एक्झिट पोलमध्ये भाजपा पालिकेतील आपली सत्ता कायम राखणार, असा अंदाज वर्तवण्यात येत असला तरी उद्या निकालात प्रत्यक्ष काय घडणार, हे पाहणे चुरशीचे ठरणार आहे.
पुण्यात गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र, २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने सत्ता मिळवली होती. आरक्षणाच्या मुद्द्यामुळे २०२२ पासून या निवडणुका रखडल्या होत्या. त्या अखेर आज पार पडल्या आहेत.
