राहाता: पुणे-नाशिक जलदगती रेल्वेमार्ग पहिल्या आरखड्यानुसार कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. यासाठी तज्ज्ञ समितीकडून अहवाल मागवून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळास दिली.
पुणे-नाशिक जलदगती रेल्वेमार्ग पहिल्या प्रस्तावित आराखड्यानुसार कार्यान्वित व्हावा या मागणीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकाराने अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची आज, शुक्रवारी भेट घेवून चर्चा केली. यावेळी माजीमंत्री आमदार दिलीप वळसे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार सरोज अहिरे, आमदार अमोल खताळ, आमदार शरद सोनवणे, आमदार बाबाजी काळे उपस्थित होते.
शिष्टमंडळाने पुणे-नाशिक रेल्वे मार्ग पहिल्या प्रस्तावित मार्गानूसारच कार्यान्वित करावा. हा मार्ग पुणे, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यांच्या कृषी व औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अशी भूमिका मांडली. यापुर्वी या मार्गासाठी भूसंपादनही करण्यात आले आहे. मात्र मार्गासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात केलेले बदल लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता केल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
या रेल्वे मार्गाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. यासाठी निधीचीही तरतुद केली आहे. परंतू तांत्रिक अडचणींमुळे या मार्गात बदल करण्याचा निर्णय झाला असला तरी, या प्रकल्पाची तांत्रिक अचुकता व कालबध्द अंमलबजावणी करण्यासाठी तज्ज्ञांची उच्च्स्तरीय समिती स्थापन करुन, अहवाल मागविण्यात येईल. अहवालानूसार केंद्र सरकारकडे प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत आपण स्वत: पाठपुरावा करु, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिली.
राहुरी ते शनिशिंगणापूर या प्रस्तावित रेल्वेमार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. राहुरी ते शनिशिंगणापूर मार्गात जात असलेले क्षेत्र बागायती आहे. त्यामुळेच शेतकरी जमीन देण्यास तयार होत नाहीत. राहुरी तालुक्यात यापुर्वी विविध प्रकल्पांसाठी जमीनीचे अधिग्रहण झाल्याने प्रस्तावित रेल्वेमार्ग रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, आमदर विठ्ठलराव लंघे व आमदार अक्षय कर्डिले उपस्थित होते.
पुणे-नाशिक प्रथम प्रस्तावित रेल्वेमार्गामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर व अकोला तालुक्यातील स्थानकांच्या समावेश करण्यात आला होता. मात्र हा रेल्वेमार्गच रद्द करण्यात आल्याचे रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केले. त्यामुळे या विरोधात नागरिकांत असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.
