राहाता: पुणे-नासिक जलदगती रेल्वे मार्गाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
राज्य सरकारने याबाबतचा शासन आदेश जारी केला असून, या समितीत जेष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, रेल्वे बोर्डाचे सदस्य विवेक गुप्ता तसेच पुणे व नासिक विभागीय आयुक्तांचा समावेश करण्यात आला आहे. पावसाळी अधिवेशनात मंत्री विखे यांनी अहिल्यानगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी समवेत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी या मार्गात येत असलेल्या खोदड येथील संशोधन केंद्राच्या अभ्यासासाठी समिती नेमण्याचे आश्वासन दिले होते. राज्य सरकारने याबाबतचा शासन आदेश जारी केला आहे.
समितीला नियोजीत रेल्वेमार्गाचा प्रकल्प आराखड्याची सर्व माहिती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ‘महारेल’वर सोपविण्यात आली आहे. नाशिक आणि पुणे विभागीय आयुक्तांनी समितीला आवश्यक सर्व सहकार्य देण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पुणे-नाशिक जलदगती रेल्वेमार्ग पूर्वी नगर जिल्ह्यातील संगमनेर अकोले मार्गे प्रस्तावित करण्यात आला होता. त्यासाठी संगमनेरमध्ये भूसंपादन करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली होती. असे असताना खोडद संशोधन केंद्रामुळे हा मार्ग बदलण्यात आला. नंतर हा रेल्वेमार्गच रद्द करण्यात आला. त्या विरोधात अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोला भागातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला.
पुणे व नाशिकचा रस्ते मार्ग अत्यंत खडतर झालेला असताना रेल्वेमार्गामुळे दुर्गम भागातील विकासाला चालना मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. हा रेल्वेमार्ग मूळ प्रस्तावाप्रमाणेच व्हावा या मागणीसाठी आंदोलनेही सुरू आहेत. येत्या क्रांती दिनी, ९ ऑगस्टला चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा आमदार सत्यजित तांबे यांनी दिला आहे.
नाशिक -पुणे रेल्वेमार्गाबाबत जनतेची असलेली भावना लक्षात घेवून मुख्यमंत्री फडणवीस यांनी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याच्या निर्णयाचे आपण स्वागत करीत असून, याबद्द्ल मुख्यमंत्र्याचे आभार मानतो. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने पुणे-नाशिक रेल्वेमार्ग होणे आवश्यक असल्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे आपण यापुर्वी मांडली असून या प्रकल्पाचा पाठपुरावा सर्व लोकप्रतिनिधीना बरोबर घेवून निश्चित करणार आहे. –राधाकृष्ण विखे, जलसंपदा तथा पालकमंत्री
