Pune Parvati Case accused previous assault : पुण्यातील नसरापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार होऊन हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यातील पर्वती पायथ्याशी अशीच एक धक्कादायक घटना घडली. या घटनेत पीडित ९ वर्षीय चिमुकलीवर तिच्याच सख्ख्या आजोबांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांच्या सतर्केतमुळे हा प्रकार उजेडात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणावर पोलिसांनी सविस्तर निवेदन सादर केलं असून पीडितेच्या आई-वडिलांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
पहिल्यांदा अत्याचार झाल्याचं कळलं नव्हतं
पीडितेची आई म्हणाली, “मुलीने सांगितलं की अंगावरचे कपडे काढले होते, नखं मारली होती. माझ्या स्वतःच्या बापानेच हे कृत्य केलं आहे. मी कपड्यांच्या दुकानात कामाला आहे. मी कामावरून घरी जाण्यापूर्वीच हे घडलं आहे. तो भाड्याच्या घरात राहतो, तिथेच हे घडलं आहे. त्याने पूर्वीही असं केलं होतं, पण मला असं सांगितलं नव्हतं. पहिल्यांदा (अत्याचार झाल्याचं) कळलं नव्हतं, पण आता दुसऱ्यांदा घडलं तेव्हा कळलं.”
आरोपीला फाशी द्या
तर, पीडितेच्या वडिलांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते रिक्षा चालक असून त्यांनी आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. ते म्हणाले, “मी रिक्षा चालक आहे, माझी पत्नी कपड्याच्या दुकानात कामाला जाते. एक मुलगा घरात होता. हे सर्व सायंकाळी ७ वाजता झालं. पत्नी ९ वाजता आली.”
ते पुढे म्हणाले, वर्षभरापूर्वी त्याने माझा मोबाईल चोरला होता, तेव्हाच मी त्याला घरातून हाकलून लावलं होतं. तू माझा सासरा नाही असं सांगून हाकलून दिलं होतं. त्यानंतर त्याने कुठे घर घेतलं माहीत नाही. मुलं कुठे खेळतात हे त्याला माहीत होतं, त्यामुळे त्याने खाऊचं आमिष दाखवून मुलीला नेलं असेल.”
पोलिसांनी काय सांगितलं?
५ मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पर्वती पायथाजवळ एका वयोवृद्ध माणसाने लहान चिमुकलीवर अत्याचार केला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस तिथे पोहोचले असता तेथील नागरिकांनी आरोपीला पकडून ठेवलं होतं. पोलिसांनी तत्काळ चौकशी करून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर असं समजलं की आरोपीने स्वतःच्या ९ वर्षाच्या नातीला (मुलीची मुलगी) खोलीत बोलावलं. तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रसंग केला. परंतु शेजारील महिलेला रडण्याचा आवाज आला, त्यामुळे महिलेने हस्तक्षेप करून शेजारच्या लोकांनाही सांगितलं. शेजाऱ्यांच्या मदतीने या मुलीची सुटका केली आणि पुढील प्रसंग टळला, असं पार्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र सहाणे यांनी सांगितलं.
