Pune PCMC Mysterious Deaths: पुण्यातील संशयास्पद मृत्यूप्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. विषारी दारुमुळे १४ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. “याप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून, आणखी काही जणांना अटक होऊ शकते”, असे मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले. प्रकरण अतिशय संवेदनशील असून, कोणाचीही गय करु नका अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोलिसांना दिल्या आहेत.
आतापर्यंत आठ जणांना अटक
पुण्यात ४८ तासांत १४ जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. यात पिंपरी -चिंचवडमध्ये ९ तर पुण्यातील हडपसरमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. १४ नागरिकांचे मृत्यू हे विषारी दारुमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी आज मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आले असता त्यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले. तसेच, या प्रकरणाच्या साखळीचा शोध देखील घेतला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. आठ लोकांची अटक झाल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी आणखी काही जणांना अटक केले जाण्याची शक्यता व्यक्त केली.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
“माझं पोलिस आयुक्तांशी बोलणं झालं आहे. कोणत्या ठिकाणी हे तयार झालं हे देखील त्यांनी शोधून काढले आहे. या प्रकरणातील संशयितांनी अटक करण्यात आली आहे. अजून काही जणांचा यात समावेश असू शकतो, त्याचाही शोध घेण्याचे काम सुरु आहे. गंभीर असलेल्यांना योग्य उपचार देऊन वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आठ लोकांना अटक झाली असून, आणखी काही जणांना अटक होऊ शकते”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘मिथेनॉल’सारखा पदार्थ मिक्स केल्याचा संशय
“दोषींवर कडक कारवाई केली जाईल. ही एक प्रकारे हत्याच असून, अतिशय गंभीर कलमं देखील त्यांच्यावर लावण्यात आली आहेत”, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विषारी मद्यामध्ये मिथेनॉससारखा पदार्थ मिक्स केल्याबाबत प्रश्न विचारला असता, “मिथेनॉल सारखाच पदार्थ आहे, पोलिस यावर अधिक माहिती देतील”, असेही मुख्यमंत्र्यांनी पुढे स्पष्ट केले.
