पुणे : मुंबईहून सोलापूरकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा डबा पुणे रेल्वे स्थानकावर सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घसरला. दरम्यान, गाडीतील प्रवासी सुखरूप असून, गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
सोमवारी पहाटेचे चार वाजून पाच मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून सोलापूरकडे जाणारी वंदे-भारत एक्सप्रेस सुटली. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास सोलापूर स्थानकावर गाडी पोहचणार होती. मात्र, सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर येत असताना गाडीच्या चौथ्या डब्याची एक ट्रॉली डायमंड क्रॉसिंगवर घसरली.
या घटनेनंतर पुणे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. गाडीत प्रवास करणारे सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.पुणे रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आलेल्या यार्ड रिमॉडेलिंग कामांअंतर्गत प्लॅटफॉर्म क्रमांक तीनचे काम प्रस्तावित आहे. या प्लॅटफॉर्मवर वंदे भारत एक्सप्रेसचा डबा घसरला आहे. आता या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रवाशांची गैरसोय होऊ नये टाळण्यासाठी त्यांना दुसऱ्या रेकमध्ये हलवण्याची व्यवस्था तातडीने करण्यात आली. रेल्वे पोलीसांसह कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्याचे रेल्वे प्रशासनाकडून नमूद करण्यात आले.
प्रवाशांचे हाल
मुंबईहून सोलापूरकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा डबा पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर येत असताना घसरला. या दुर्घटनेमुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून सुटणाऱ्या आणि या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या गाड्या पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे राज्यासह देशातील विविध भागात पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला. तर, सोलापूरकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमधील प्रवाशांना गाडीसाठी आणखी काही तास वाट पहावी लागणार आहे. रेल्वे कुली, आरपीएफकडून प्रवाशांना मदत करण्यात येत आहे. पुणे रेल्वे स्थानकापासून सुमारे ५०० ते १००० मीटर अंतर अलीकडे वंदे भारतचे चाक रुळावरून घसरले. त्यामुळे प्रवाशांना वंदे भारतमधून उतरून पुणे रेल्वे स्थानकावर उपलब्ध केलेल्या विशेष रेल्वे गाडीत सामानाच्या बॅगा घेऊन चालत जावे लागत आहेत. या घटनेमुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.
पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर सोलापूरकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा डबा घसरला. या गाडीतील प्रवासी सुखरूप असून, त्यांना तातडीने दुसऱ्या रेकमध्ये हलविण्यात आले आहे. रेल्वे पोलीसांनी तातडीने मदत कार्य सुरु केले आहे. या अपघातामागची कारणांचा तपास करण्यात येत आहे.- हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग
