पुण्यात रेकॉर्डब्रेक उन्हाळा; ३६ वर्षांतील सर्वाधिक तापमान

पुढील दोन दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार

(संग्रहित छायाचित्र)

सध्या निवडणुकांचे वारे महाराष्ट्रभर वाहत आहेत. पण खऱ्याखुऱ्या वार्याला मात्र महाराष्टाचा विसर पडल्याचे चित्र आहे. उष्णतेच्या लाटेमुळे वाढलेल्या तापमानाने राज्याला सलग तिसऱ्या दिवशी शनिवारी हैराण केले. महत्वाची बाब म्हणजे स्कायमेटच्या वृत्तानुसार, पुण्यात शनिवारी तब्बल ४२.९ अंश सेल्सिअस तापमानाची करण्यात आली. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान ठरले. यातही विशेष म्हणजे गेल्या ३६ वर्षांतील हे पुण्याचे सर्वाधिक तापमान ठरले. या आधी ३० एप्रिल १९८७ साली पुण्यात ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

याशिवाय, शनिवारी राज्यातील सर्वाधिक तापमान अकोल्यामध्ये नोंदविण्यात आले. अकोल्यात ४६.७ अंश सेल्सिअस तापमान होते. कोकण, महाबळेश्वर वगळल्यास सर्वत्र कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्याचे आढळून आले. सर्वाधिक किमान तापमानाची नोंद कोल्हापूरमध्ये करण्यात आली. कोल्हापुरात २५.९ अंश सेल्सिअस तापमान होते.

विदर्भातही शनिवारी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम होता. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान नगर जिल्ह्यामध्ये (४५.१ अंश सेल्सिअस) नोंदविण्यात आले. वातावरणातील बदलांमुळे शुक्रवारपासून विदर्भातील बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट आहे. कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत प्रचंड वाढ झाल्याने नागरिकांना उन्हाळा असह्य होऊ लागल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात ही उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

यंदाही सर्वाधिक उष्णवर्ष?

गेल्या शतकातील भारतीय हवामान खात्याच्या नोंदीनुसार, १८९२, १९७३, १९८९, १९९६, २००५ आणि २००७ ही वर्षे सर्वाधिक उष्णतेच्या लहरीची वर्षे ठरली आहेत. मात्र, या उष्णतेच्या लहरी मे महिन्याच्या अखेरीच्या  काळातील आहेत. यावर्षीचा तापमानाचा अंदाज पाहता हे वर्षदेखील या यादीत जोडले  जाण्याची शक्यता आहे. प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ हे घटक वाढत्या तापमानाला कारणीभूत असले तरीही गुजरात, राजस्थानमधून  येणारे उष्ण वारेदेखील तितकेच कारणीभूत ठरत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pune records highest temperature in this season and last 36 years

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या