Pune Satara Highway Accident Shirwal updates: “मी त्याला बोललो होतो महाबळेश्वरला सहलीसाठी जाऊ नको, तरीही त्याने माझे ऐकले नाही आणि तो गेला”, हे विधान आहे अपघातात आपला १० वर्षांचा मुलगा गमावलेल्या धीरेंद्र ठाकूर यांचे. पुणे जिल्ह्यातून महाबळेश्वरला सहलीसाठी जात असताना पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ येथे मंगळवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत. १९ वर्षीय सोनू सिंहचा याच अपघातात मृत्यू झाला. पुण्यातील टाकवे येथे सोनू सिंहचे मोबाइल दुरुस्तीचे दुकान होते. या दुकानाच्या माध्यमातून आपण दोन वर्षांत सुस्थितीत येऊ, मग लग्न करू, असे वचन सोनूने आपले वडील धीरेंद्र ठाकूर यांना दिले होते.

या भीषण अपघातात मावळ व कामशेत परिसरातील वेदांत अर्जुन वारिंगे, सोनू सिंह धीरेंद्र ठाकूर, आदित्य बाळासाहेब गरुड आणि तळेगाव दाभाडे येथील निखिल बाळू राऊत या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर दीक्षित दयानंद पुजारी आणि मयूर हनुमंत शिंदे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेली मोटार मध्यभागी असलेल्या डिव्हायडरला जोरदार धडकून पलटी झाली आणि उडून विरुद्ध दिशेच्या मार्गीकेमध्ये जाऊन समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली.

सोनूच्या कुटुंबीयांसाठी मंगळवारची रात्र काळरात्र ठरली. हे सर्व मित्र कामशेतहून रात्री जवळपास ९.३० वाजता सहलीसाठी दोन गाड्यांतून निघाले. रात्री १.१५ वाजता त्यांना अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कुटुंबीय तात्काळ शिरवळला पोहोचले. धीरेंद्र ठाकूर म्हणाले की, आम्ही रात्री ३.३० वाजता शिरवळला पोहोचलो. तिथे आम्हाला मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी रुग्णालयात जाण्यास सांगितले. शवविच्छेदन केल्यानंतर सकाळी ७.३० वाजता मृतदेह आमच्या ताब्यात देण्यात आला.

pune bangalore highway shirwal accident four youths from maval talegaon died
पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारी वरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले.

मित्राने काय सांगितले?

सोनूचा जवळचा मित्र आणि व्यावसायिक भागीदार रोहन चौधरीने सांगितले की, आमचा मित्र विराज शेळकेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही सहल माथेरानला जाणार होती. मात्र नंतर सर्वांनी ठिकाण बदलले आणि रात्री उशिरा महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन केला.

चौधरीने पुढे सांगितले की, मावळहून जवळपास १२ लोक सहलीसाठी निघाले होते. सोमवारी रात्री निघून मंगळवार महाबळेश्वरमध्ये घालवण्याचा विचार होता. महाबळेश्वर खूप दूर असल्यामुळे मी तिथे जाण्याचा विचार बदलला. दोन दिवसांसाठी मोबाइल दुरुस्तीचे दुकान बंद ठेवणे मला परवडणार नव्हते. सोनूने मागच्या दीड-दोन महिन्यात एकही सुट्टी घेतली नव्हती. त्यामुळे तो सहलीला गेला.

चौधरीने पुढे म्हटले की, पुण्यातील कान्हे येथे सर्वांनी मिळून शेळकेचा वाढदिवस केक कापून साजरा केला होता. त्यानंतर ते लोक दोन गाड्यामधून पुढे निघाले. पुढे जाऊन असा भीषण अपघात होईल, असे कुणालाच वाटले नव्हते. ज्या गाडीचा अपघात झाला ती गाडी वेदांत वारिंगे याच्या वडिलांची होती. मयूर शिंदे गाडी चालवत होता. तर दीक्षित पुजारी त्याच्या शेजारी बसला होता. हे दोघेही अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. तर मागे बसलेले चारही जण मृत्यूमुखी पडले.

एकुलत्या एक मुलाचाही मृत्यू

या अपघातात आदित्य गरुडचाही (वय १९) मृत्यू झाला. त्याचे काका निलेश गरुड यांनी सांगितले की, आदित्य त्याच्या महाविद्यालयातील मित्रांबरोबर सहलीला जात होता. तो लोणावळ्याच्या व्हीपीएस कॉलेजमध्ये शिकत होता. आदित्य त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

पोलीस सध्या अपघाताच्या कारणांचा आणखी तपास करत आहेत. तपास अधिकारी नितीन खामगळ यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचे दिसत आहे. दुभाजकाला गाडी आदळल्यानंतर ती उलटली आणि पलीकडील लेनमध्ये जाऊन उडाल्यानंतर वाहनाची धडक ट्रकला बसली. चालकाने अंमली पदार्थांचे सेवन केले होते का, याचा तपास केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.