Fruits Vegetables Pesticide Remover: ‘दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरांना दूर ठेवा’, अशी म्हण आपण ऐकली असेल. निरोगी राहण्यासाठी ताजी फळे, भाज्या खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. पण आपण जी फळे किंवा भाज्या खातो, त्या खरोखरच किती स्वच्छ किंवा सुरक्षित असतात? हाही एक मोठा प्रश्न आहे. शेतात पिकलेली फळे, भाज्या आपल्या ताटापर्यंत येईपर्यंत त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचे अंश, धूळ आणि इतर घातक सूक्ष्मजीव साचतात. मग आपण शरीराला चांगली आहेत म्हणून खात असलेली फळे, भाज्या सुरक्षित आहेत का? हाच प्रश्न राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ अस्मिता प्रभुणे यांना पडला आणि त्यांनी यावर उत्तरही शोधले.
भारतात गेल्या काही वर्षांपासून शेतातील पिकांवर मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर केला जात आहे. जून महिन्यात याच कारणामुळे नेपाळने भारतातील आंब्यांच्या निर्यातीवर बंदी घातली होती. तसेच याच कारणास्तव गेल्या काही वर्षांत युरोपीय देशांनीही भारतातील अनेक कृषी उत्पादनांवर बंदी घातली आहे.
खाद्यपदार्थांवरील कीटकनाशकांमुळे डोकेदुखी, श्वसनसंस्थेचे संसर्ग आणि अतिसारापासून ते लहान मुलांमधील ‘एडीएचडी’, कर्करोग आणि पार्किन्सन्ससारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. अस्मिता प्रभुणे सांगतात की, नळाच्या पाण्याखाली फळे-भाज्या धुणे किंवा मीठ-व्हिनेगरच्या पाण्याने स्वच्छ करणे पुरेसे नाही.
प्रभुणे यांनी २०२० साली करोना महामारीच्या काळात ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत नैसर्गिक आणि अल्कोहोलमुक्त सॅनिटायझर तयार केले होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने यासाठी निधी दिला होता. खाद्यपदार्थांवरील कीटकनाशकांच्या धोक्यावर दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठी प्रभुणे यांनी ग्रीन पिरॅमिड बायोटेक या स्टार्टअपची स्थापना केली होती. पुण्यातील व्हेंचर सेंटरमध्ये ही कंपनी विकसित झाली असून नॅशनल केमिकल लॅबोरेटरीची ती उपकंपनी आहे.
निसर्गाला कोणतीही हानी न पोहोचवता मानवी आरोग्य सुरक्षित ठेवणे, हे या कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. अन्न सुरक्षा, कृषी उत्पादनांची स्वच्छता आणि दैनंदिन आरोग्य सुधारण्यासाठी वैज्ञानिक संशोधनाचा उपयोग करण्यासाठी या कंपनीने प्रयत्न केले आहेत.
कीटकनाशके धुवून टाकणारे उत्पादन कोणते?
प्रभुणे यांनी ‘सोफॅब’ नावाचे विशेष नैसर्गिक लिक्विड विकसित केले आहे. ते फळे आणि भाज्यांवरील ९९ टक्के कीटकनाशके, सूक्ष्मजीव आणि रासायनिक अवशेष काढून टाकण्यासाठी मदत करते.
सोफॅबचा वापर कसा करावा?
- हे लिक्विड बाजारात आणि ॲमेझॉनवर उपलब्ध आहे. पाण्यात हे लिक्विड मिसळून त्यात फळे किंवा भाज्या २ ते ३ मिनिटे बुडवून ठेवाव्यात त्यानंतर हाताने हलकेच चोळून स्वच्छ करावे.
- फळे आणि भाज्या धुतलेले हे पाणी पूर्णपणे सुरक्षित असून ते फेकून न देता घरात लावलेल्या झाडांच्या मातीत टाकण्यासाठी वापरता येते.
- फळे आणि भाज्यांवरील धूळ आणि सूक्ष्मजीव निघून गेल्यानंतर ते अधिक काळ ताजे राहण्यास मदत होते.
लवकरच येणार फळांसाठीचे खास ‘वाईप्स’
ग्रीन पिरॅमिड बायोटेक कंपनी लवकरच फळांसाठी विशेष वाईप्स बाजारात आणणार आहे. प्रवासात किंवा कुठेही फळ खावेसे वाटल्यास या वाईपने फळ पुसून थेट खाता येणे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानाचे संशोधन पूर्ण झाले असून लवकरच उत्पादन सुरू होईल, अशी माहिती प्रभुणे यांनी दिली. याशिवाय चिकन, मटण आणि माशांवरील जीवाणू नष्ट करण्यासाठी, तसेच कोरडे केस व त्वचेच्या स्वच्छतेसाठी (ड्राय शॅम्पू व ड्राय बॉडी क्लिन्झर) विविध उत्पादने कंपनीने विकसित केली आहेत.
