scorecardresearch

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मुलाच्या लग्नात दोन हजार वऱ्हाडी, करोना नियमांचा फज्जा

लग्नसोहळ्यासाठी फक्त २०० लोकांची परवानगी असताना तब्बल दोन हजार लोकांच्या उपस्थित हा लग्न सोहळा पार पडल्याचं समोर आलं आहे.

Pune Shiv Sena ZP Member Devram Lande Break Rules Covid19 at Son Marriage gst 97
शनिवारी (२८ ऑगस्ट) देवराम लांडे यांच्या मुलाचा हा लग्न सोहळा पार पडला.
पुण्यातील शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात करोना प्रतिबंधक नियमांचा फज्जा उडाला आहे. या प्रकरणी आता जुन्नर पोलिसांकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य देवराम लांडे यांच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लग्नसोहळ्यासाठी फक्त २०० लोकांची परवानगी असताना तब्बल दोन हजार वऱ्हाड्यांच्या उपस्थित हा लग्न सोहळा पार पडल्याचं समोर आलं आहे. शनिवारी म्हणजेच २८ ऑगस्टला हा विवाह सोहळा पार पडल्याची माहिती मिळत आहे. यामुळे, पुन्हा एकदा शिवसैनिकच मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला हरताळ फसतात अशी टीका होऊ लागली आहे.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असताना देवराम लांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. तर आता ते शिवसेनेत आहेत. दरम्यान, लांडे यांनी या प्रकरणी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. “मी दोनशे लोकांची परवानगी घेतली होती. पण मी लोकांच्या गळ्यातील ताईत आहे. मी त्यांच्या लग्नाला जात असल्याने ते देखील माझ्या मुलाच्या लग्नाला आले. मला नियम तोडायचे नव्हते”, असं लांडे म्हणाले. दरम्यान, २ स्वतंत्र गुन्हे दाखल केल्यानंतर आता जुन्नर पोलीस लग्न कार्यालय देखील सील करण्याच्या दिशेने कारवाई करण्याची शक्यता आहे.

देवराम लांडे यांचं स्पष्टीकरण

आपल्या मुलाच्या लग्नसोहळ्यात झालेल्या करोना नियमांच्या उल्लंघनासंदर्भात बोलताना देवराम लांडे म्हणाले कि, “मी लोकांना आवाहन केलं होतं की गर्दी करु नका. तरी मी आदिवासी भागातील कार्यकर्ता असल्याने लोकांनी लग्नाला अचानक येण्यास सुरुवात केली. मी गेल्या २५ वर्षांपासून माझ्या ओळखीतील गोरगरीबांच्या लग्नाला जात होतो. त्यामुळेच प्रेमापोटी ती लोकं देखील आली. मी पत्रिका पण कमी वाटल्या होत्या. डीजे वाजवला नाही. साधेपणाने करण्याचा खूप प्रयत्न होता. मात्र, लोकांचा आग्रह होता. आहेराचा कार्यक्रम आमच्याकडे असतो. त्यानुसार नियोजन होतं. पण ते नियोजन थोडसं फसलं.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune shiv sena zp member devram lande break rules covid19 at son marriage gst

ताज्या बातम्या