पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील तळेगाव येथे रस्त्याखालून अचानक पाण्याचा प्रवाह सुरू झाला अन् आजूबाजूचे नागरिकही भयभीत झाले. पण त्यामागचं खरं कारण समोर आलं तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. परंतु, हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रशासकीय कामांवर अनेकांनी टीका करायला सुरुवात केली आहे.
जलवाहिनीच्या जोडणीत हलगर्जीपणा
पुण्याच्या तळेगाव दाभाडेतील ही घटना आहे. शहरातील डांबरी रस्त्याच्या खालून अचानक पाण्याचा प्रचंड फवारा उसळला. त्यामुळे आजूबाजूचे नागरिकही अचंबित झाले. हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दीड वर्षांपूर्वी तळेगाव दाभाडे शहरात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत रस्त्याखालून नवीन जलवाहिनी टाकण्यात आली होती. त्यानंतर रस्त्याचे डांबरीकरणही करण्यात आले. पुढील आठवड्यात या पाण्याच्या योजनेचा शुभारंभ होणार होता. त्यापूर्वी नगरपरषदेकडून शनिवारी जलवाहिनी चाचणी घेण्यासाठी नव्या टाकीतून पाणी सोडण्यात आलं.
नगरपरिषेदेने घेतली दखल
वाहिनीतून पाणी सोडताच रस्त्याच्या मधूनच पाण्याचा प्रचंड फवारा आला. जलवाहिनी जोडणी करताना कंत्राटदाराने दोन पाईप एकमेकांना जोडले नसल्याने संबंधित प्रकार घडल्याचं आता स्पष्ट झालं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दपकेकर यांनी संबंधित कंत्राटदाराकडूनच पाईपलाईनची दुरुस्ती आणि रस्त्याच्या पुनर्बांधणीचा संपूर्ण खर्च वसूल केला जाईल, अशी माहिती दिली आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आधीच पावसामुळे रस्ते खचत आहेत, झाडे उन्मळून पडत आहेत. असं असताना असा प्रकार घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “पुण्यात तळेगावमध्ये चक्क रस्त्याची डिलिव्हरी होऊन ‘विकास’ जन्माला आला…. जन्मल्याबरोबर विकास इतका वेगात धावायला लागला की धावता धावता मग मुंढवा भागात तो असा खड्ड्यात पडला… हे आहे, महाराष्ट्रातील ‘विकासाचं मॉडेल’”, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली.
