सोशल मीडियावर सध्या पुण्यातील गुरू उमेश भीमराव तागुंदे (पप्पा) यांचे अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये त्यांच्या अनेक महिला व इतर शिष्य पाणी आणि दुधाने त्यांचे पाय धुवून ते प्राशन करताना दिसत आहेत. या प्रकारामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली असून, हा अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता या सर्व प्रकारावर आध्यात्मिक गुरू असलेल्या उमेश तागुंदे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे, त्यात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत.
‘पप्पा’ नाव कसे पडले?
या संदर्भात विचारणा केली असता, तागुंदे यांनी सांगितले की २००६ मध्ये एक अनोळखी मुलगा त्यांच्याकडे आला होता. त्यांनी त्याचा सांभाळ केला आणि त्याच्यावर आई-वडिलांसारखे प्रेम केले. त्या मुलाने त्यांना ‘पप्पा’ म्हणण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासून सर्व भक्तगण त्यांना ‘पप्पा’ असेच संबोधू लागले.
पाय धुऊन पाणी पिण्यावर तागुंदेंचा खुलासा काय?
पाय धुतलेले पाणी पिणे किळसवाणे वाटत नाही का आणि हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे का, असा प्रश्न ‘एबीपी माझा’ने विचारला असता तागुंदे म्हणाले, “मी माझ्या गुरूंचे पाय धुऊन पाणी पितो आणि अजूनही पितो. गुरुपौर्णिमेलाही मी माझ्या गुरूंचे पाय धुतले आणि पाणी प्यालो. मी माझ्या भक्तांना कधीच माझे पाय धुऊन पाणी प्या असे म्हटले नाही. मी त्यांना वारंवार नको म्हणून विरोध करतो, पण तरीही त्या ऐकत नाहीत. ही त्यांच्या भावना आणि श्रद्धेचा भाग आहे. मराठीत म्हण आहे, ‘तुमचे माझ्यावर एवढे उपकार आहेत की पाय धुऊन पाणी पिले तरी ते कमीच आहे’.”
उमेश तागुंदेंची पार्श्वभूमी आणि व्यवसाय
उमेश तागुंदे हे पुणे जिल्ह्यातील वारजे माळवाडी येथे राहणारे असून ते देवी काळूबाईच्या (आई काळेश्वरी) भक्तीशी संबंधित आध्यात्मिक प्रवचने व ‘दरबार’ आयोजित करतात.
- शिक्षण: १२ वी पर्यंत (वाघोली आणि नवभारत हायस्कूल, शिवणे येथे).
- व्यवसाय: त्यांचा दुग्धव्यवसाय, भाजीपाल्याचा व्यवसाय (भाजी चिरून पॅकिंग करणे) आणि चौकात हॉटेल आहे. याशिवाय ते सध्या जागा खरेदी-विक्रीचा व्यवहार करतात आणि बांधलेल्या खोल्यांच्या भाड्यावर उत्पन्न मिळवतात.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची प्रतिक्रिया काय?
या संपूर्ण प्रकारावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोलकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
- त्यांनी हा प्रकार अत्यंत किळसवाणा आणि आरोग्याच्या समस्या निर्माण करणारा असल्याचे म्हटले आहे.
- दाभोलकर म्हणाले, “महाराष्ट्राला बुवाबाजीचा विळखा पडल्याचे दिसतेय, पण ही महाराष्ट्राची परंपरा नाही. संत गाडगेबाबा म्हणाले होते की ‘माझा कोणी गुरू नाही आणि मी कुणाचा शिष्य नाही’, तर ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ म्हणजेच आपल्या कामातच देव आहे, ही खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे.”
- सध्या महाराष्ट्रात ‘डिजिटल बुवाबाजी’ वाढली असल्याचे सांगत, या प्रकारावर प्रशासनाकडून कारवाई व्हायला हवी आणि त्यासाठी योग्य यंत्रणा तयार केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
