Vidyanand Bapat Assault Supriya Sule Allegation: डिजे आणि लाऊडस्पीकरविरोधात आग्रही भूमिका घेणाऱ्या विद्यानंद बापट यांना काही अज्ञात तरुणांनी मारहाण केल्यानंतर पुण्यात याची तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या घटनेनंतर संताप व्यक्त केला. टीव्ही ९ शी बोलताना त्या म्हणाल्या, “माध्यमांशी बोलताना एखाद्याला कोण मारतंय? कशासाठी मारतंय? हिंमत कशी होते? जर शांततापूर्ण मार्गाने माध्यमांशी कुणी बोलत असेल, तर हा लोकशाहीतला अधिकार आहे. असं करताना जर मारहाण होत असेल तर ही गुंडगिरी आहे. हा मारणारा कोण आहे? त्याला तातडीने अटक केली पाहिजे.”

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा तो कोण आहे याची माहिती घेतली पाहिजे. हा फक्त मारणारा आहे, पण त्याच्या मागे कुठली ताकद आहे का हेही तपासलं पाहिजे. आज मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांना यावर उत्तर द्यावं लागेल. लोकशाही पद्धतीने एक माणूस माध्यमांशी संवाद साधतोय आणि कुणीही येऊन त्याच्यावर हात उचलतोय. हे आम्ही सहन करणार नाही. मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जायला हवी.”

मुख्यमंत्री फडणवीस यांना माहिती देणार

मी लगेच मुख्यमंत्र्यांना फोन करणार आहे, असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. “हिंमत कशी होते अशी मारहाण करण्याची? त्याच्या मागे मोठी कुणीतरी ताकद असल्याशिवाय कोण अशी हिंमत करेल? यातून महाराष्ट्राची बदनामी होतेय. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी हे गुंड आवरावेत. लोकशाहीची हत्या होत आहे. लोकशाही राहिलीच नाही का? खरे बोलले तर हे लोक मारामारी करणार? हा देश लोकशाही तत्वानुसारच चालणार. कुणी नियम-कायदा मोडण्याचा प्रयत्न केला असेल, तर आम्ही अशा या विक्षिप्त वागण्याच्या विरोधात शांततेच्या मार्गाने लढा देणार”, असे सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले.

मारहाणीनंतर विद्यानंद बापट काय म्हणाले?

या घटनेनंतर विद्यानंद बापट यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, मी वृत्तवाहिनीशी बोलत असताना काही टवाळखोरांनी येऊन मला बोलण्यापासून रोखले. त्यांना माझी भूमिका पटलेली नसावी. मी वाहिनीशी बोलत असताना निशस्त्र होतो, याचाच फायदा घेऊन त्यांनी मला बोलण्यापासून रोखले आणि मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांना सवंग प्रसिद्धी हवी होती, म्हणून त्यांनी हे कृत्य केले असावे. मुद्द्यांना मुद्द्याने उत्तर देता येत नाही, त्यावेळी अशाप्रकारे भूमिका घेतली जाते. सदर घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

विद्यानंद बापट पुढे म्हणाले की, मला सवंग प्रसिद्धी कधीही नको आहे. पण ज्या लोकांना अशाप्रकारची प्रसिद्धी आहे, त्यांच्याकडून अशाप्रकारे मारहाण करता येते. वेडे लोक असतात ते. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. माझा गणेशोत्सवाला कधीही आक्षेप नव्हता. मी फक्त डिजेच्या आवाजाला विरोध केला होता.

कोण आहेत विद्यानंद बापट?

पुणे महानगरपालिकेत गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित केलेल्या बैठकीत डीजे आणि कर्णकर्कश ध्वनिक्षेपकांविरोधात भूमिका मांडल्यानंतर विद्यानंद बापट चर्चेत आले होते. त्यांच्या या भूमिकेला विरोध करत गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी बैठकीतून बाहेर काढले. या बैठकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात त्यांची चर्चा होऊ लागली. त्यानंतर विविध माध्यमांना त्यांनी मुलाखती देऊन आपली मागणी पुढे केली.

विविध माध्यम आणि पॉडकास्टना दिलेल्या मुलाखतीत विद्यानंद बापट यांनी त्यांचा ध्वनिप्रदुषणाबाबतचा मुद्दा अत्यंत चपखलपणे मांडला आहे. संयत, संयमी आणि प्रभावी मराठी भाषेत त्यांनी त्यांचा मुद्दा समाजासमोर ठेवला आहे. त्यांची ओघवती भाषा आणि प्रमाण मराठी भाषेतील शब्द लोकांची पसंती मिळत आहे.

३७ वर्षीय विद्यानंद बापट हे बीपीओमध्ये काम करतात. मुळचे रत्नागिरीची असलेले बापट गेल्या सात वर्षांपासून ते पुण्यातील नारायण पेठेत स्थायिक झालेले आहेत. विद्यानंद बापट यांनी मुंबई विद्यापिठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली असून पुण्यातील पुरोगामी संघटनांच्या विविध उपक्रमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होत असतात.