Vidyanand Bapat on Ganeshotsav Pune : पुण्यातील गणेशोत्सव किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रमात डीजे आणि कर्णकर्कश लाऊडस्पीकरवर बंदी आणावी म्हणून शनिवार पेठेतील विद्यानंद बापट यांनी आग्रही मागणी केली आहे. ही मागणी त्यांनी महापालिकेतील महासभेतही बोलून दाखवली. तेव्हापासून विद्यानंद बापट चर्चेत आले असून त्यांना राज्यभरातून समर्थन मिळत आहेत. मात्र, काहीजणांनी विद्यानंद बापट यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला असून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. या ट्रोलिंगवरही विद्यानंद बापट यांनी चपखल उत्तर दिलं असून प्रथा परंपरांच्या नावाखाली कुप्रथा रूढ होत असतील तर त्या मोडित काढल्या पाहिजेत, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. ते लोकसत्ता ऑनलाईनशी बोलत होते.

टीकाकारांचे मुद्दे मी खणून काढलेत

ट्रोलिंगविषयी बोलताना विद्यानंद बापट म्हणाले, “गेल्या सात-आठ दिवसांत जे संपर्क झाले, फोन कॉल, मेसेज आले, लोक प्रत्यक्षात भेटले, ते समर्थन करतानाच दिसले. टीका करणारेही दिसले. पण टीका करणाऱ्यांकडे युक्तीवाद नाही. ते विषयाला फाटा देण्याचा प्रयत्न करत आहेत. तथाकथित अनेक मुद्द्यांचं खंडण करून झालंय. प्रथा परंपरा, रोजगार गुंतलेले असे मुद्दे ते काढत असून त्यांचं मी खंडन केलं आहे. त्यामुळे ते तेच तेच मुद्दे खणून काढत आहेत.”

प्रथेच्या नावाखाली कुप्रथा सुरू ठेवायची का?

“गणेशोत्सवाची इतक्या वर्षांची प्रथा-परंपरा आहे, असं ते म्हणत आहेत. मुळात गणेशोत्सव १३२ वर्षांपूर्वी सुरू झाला. त्यापूर्वीही लोक जगत होते”, असं म्हणत विद्यानंद बापट म्हणाले, “तुम्ही ती मार्केटिंग लाईन काढली आहे आणि प्रथा-परंपरा मानत आहात. प्रथा परंपरा म्हणून एखादी गोष्ट बंद करायची नाही, हे तार्किकदृष्ट्या अजिबात न्यायिक नाही. सती प्रथा भारतात होती. रामायण-महाभारतापासून होती. पण यामुळे मूलभूत अधिकारच हिरावून घेतले जात होते. त्यावर कायद्याने बंदी आणली. तेव्हाही सुधारकांनी त्यांचं स्वागत केलं. तशीच प्रथा होती बालविवाहाची. तीही बंद केली. विधवा केशवपन, द्विभार्या या प्रथा ब्रिटिश काळातच बंद पाडल्या”, असं विद्यानंद बापट यांनी स्पष्ट केलं.

“गणेशोत्सव हा व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणून मानता येईल. पण त्याकरता सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर लावणे, वाद्य, रणवाद्य वाजवणे, रस्त्यावर अतिक्रमण करून मंडप बांधणे, रस्त्याला अडथळा होईल अशा मिरवणुका काढणे, या हास्यास्पद कुप्रथा रुढ झाल्या आहेत. या प्रथा आहेत म्हणून याचं समर्थन करता येत नाही. त्या मोडूनही काढता येतात. या प्रथा पूर्णपणे मोडून काढल्या पाहिजेत”, असं विद्यानंद बापट म्हणाले.