राहाता: पुणे येथिल तरुणाचे अपहरण करून त्याला थेट उत्तर प्रदेशात पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार समृद्धी महामार्गावर उघडकीस आला. महामार्ग पोलिसांनी समृद्धी महामार्गवर तीन किमीपर्यंत पाठलाग करत मोटार अडवली. ही कारवाई काल, बुधवारी रात्री १०.३० च्या सुमारास करण्यात आली. महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि थरारक पाठलागामुळे आरोपी जेरबंद झाले.

पकडलेल्या आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अपहरण झालेल्या पिडीत तरूणाला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती बाभळेश्वर सुरक्षा महामार्ग केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब ठोंबरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलतांना दिली.

याबाबत माहिती अशी की, पिंपरी चिंचवड येथिल चिखली परिसरातून आरशद शकील अहमद सिद्दीकी (वय २४ वर्ष, रा. मोरे वजन काटयाजवळ मोरे पाटील चौक, चिखली, पुणे) यांचे बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास अज्ञात तिन ते चार व्यक्तींनी अपहरण करून उत्तर प्रदेश येथे घेवुन चालल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून समृद्धी नियंत्रण कक्षाला मिळाली होती. संशयित आरोपी अर्टिगा मोटारीतून (युपी ९० एई ९३७५) पीडित तरुणाला घेऊन समृद्धी महामार्गाने सिन्नरकडून नागपूरच्या दिशेने पळ काढत आहेत, ही माहिती मिळताच बाभळेश्वरच्या महामार्ग पोलिसांनी समृद्धी महामार्गावर शोधमोहीम सुरू केली. चॅनल क्र. ५३२ ते ५०२.७ दरम्यान गस्त घालताना, चॅनल क्र. ५२३ जवळ पोलिसांना संशयित अर्टिगा मोटार भरधाव वेगाने जाताना दिसली.​ पोलिसांनी मोटारीचा पाठलाग सुरू केला. सलग ३ किमीच्या थरारानंतर चॅनल क्र. ५२० जवळ पोलिसांनी मोटारीला घेरले आणि थांबवले.

मोटारीतील आरोपी महमद अन्वर सिद्दीकी (वय ३९), निजामुद्दीन सिद्दीकी (वय ४१), फाजील हुसेन सिद्दीकी (वय २३), महंमद साहील सिद्दीकी (वय २१), महंमद सिद्दीकी इमामुद्दीन सिद्दीकी आणि सायमा खातून सिद्दीकी (वय २६, महिला सर्व रा. उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी पीडित तरुण, ६ संशयित आरोपी आणि अर्टिगा मोटार कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपींना कोपरगाव शहर पोलिसांकडून ताब्यातून घेतले. पुढील तपास पिंपरी-चिंचवड पोलीस करत आहेत. याबाबत तरूणाच्या अपहरणाचा गुन्हा पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

बाभळेश्वर महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब ठोंबरे, पोलीस नाईक महेश बोरुडे, रामचंद्र साळुंके, पोलीस प्रवीण पालवे, रोहित आरवडे आणि शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.