दापोली : समुद्रकिनाऱ्यावर साहसी ड्रायव्हिंगचा मोह आणि स्थानिकांच्या सूचनांकडे केलेले दुर्लक्ष पुण्यातील काही पर्यटकांना चांगलेच महागात पडले. दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील सावणे समुद्रकिनाऱ्यावर समुद्राच्या पाण्यात एसयूव्ही कार चालवण्याचा प्रयत्न करताना वाहन मऊ वाळूत रुतून बसल्याची घटना घडली. या प्रकारामुळे काही काळ किनाऱ्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या प्रयत्नांनंतर वाहन बाहेर काढण्यात यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील काही पर्यटक पर्यटनासाठी आंजर्ले परिसरात आले होते. सावणे समुद्रकिनाऱ्याचा विस्तीर्ण आणि सपाट किनारा पाहून त्यांनी आपली एसयूव्ही कार थेट किनाऱ्यावर उतरवली. सुरुवातीला वाहन किनाऱ्यावर फिरविल्यानंतर त्यांनी भरतीच्या पाण्याच्या दिशेने कार नेण्याचा प्रयत्न केला. समुद्राच्या पाण्यालगत असलेल्या मऊ वाळूचा अंदाज न आल्याने वाहनाचे चाक खोलवर रुतले आणि कार जागेवरच अडकून पडली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी पर्यटकांना भरती सुरू असल्याने वाहन समुद्राच्या पाण्याजवळ नेऊ नये, असा इशारा दिला होता. मात्र पर्यटकांनी त्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात येते. काही वेळानंतर वाहन वाळूत अधिकच खोलवर अडकले. कार बाहेर काढण्यासाठी पर्यटकांनी स्वतः प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले. दोरखंड आणि इतर साधनांच्या साहाय्याने जवळपास तासभर प्रयत्न केल्यानंतर एसयूव्ही कार सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तथापि, वाहनाच्या खालच्या भागाला तसेच यांत्रिक प्रणालीला नुकसान झाले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दाभोळ ते केळशी दरम्यानच्या किनारपट्टीवर समुद्राच्या पाण्यात किंवा मऊ वाळूत वाहने नेण्यास स्थानिकांकडून वारंवार विरोध केला जातो.भरती-ओहोटीमुळे वाळूची रचना सतत बदलत असल्याने वाहन अडकण्याचा धोका वाढतो. तरीदेखील काही पर्यटक साहसी ड्रायव्हिंगच्या मोहापोटी अशा सूचनांकडे दुर्लक्ष करतात. परिणामी अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याची खंत स्थानिकांनी व्यक्त केली.
आंजर्लेतील ही घटना समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटन करताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे किती आवश्यक आहे, याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारी ठरली आहे. पर्यटकांनी स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांच्या सूचनांचा आदर करून जबाबदारीने पर्यटन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
