पुण्याची महाराष्ट्रीय कलोपासक आणि येथील परिवर्तन संस्था यांच्या वतीने आयोजित पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेस मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून ‘जय मल्हार’ मालिकेतील ‘म्हाळसा’ म्हणजेच सुरभी हांडे यांच्यासह अभिनेते दिग्दर्शक नंदू माधव, कवी ना. धों. महानोर, सुरेश भोळे, रत्ना जैन आदी उपस्थित होते. ‘एकला चलो रे’ या रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. अभिनेत्री सुरभी हांडे यांना दिग्दर्शक नंदू माधव यांच्या हस्ते यादव खैरनार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रस्तावनेत परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली. स्पर्धेत खान्देशातील १६ आणि मराठवाडय़ातील सात महाविद्यालयांचा सहभाग असून २३ एकांकिका सादर होणार आहेत. बेंडाळे महाविद्यालयाच्या ‘एक होतं आटपाट नगर’ एकांकिकेने स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ पत्रकार मीना कर्णिक, दिग्दर्शक अमित अभ्यंकर, विजय पटवर्धन हे करणार आहेत. सूत्रसंचालन हर्शल पाटील यांनी केले. आभार नारायण बाविस्कर यांनी मानले.